पुणे : चैतन्यमय पर्वास प्रारंभ बाप्पांच्या; स्वागताची जय्यत तयारी | पुढारी

पुणे : चैतन्यमय पर्वास प्रारंभ बाप्पांच्या; स्वागताची जय्यत तयारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मांगल्याचे प्रतीक असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाचे आज आगमन होत आहे. कोरोनामुळे जो सोहळा साधेपणाने साजरा झाला, आता तोच देदीप्यमान सोहळा दोन वर्षांनंतर जल्लोषात साजरा होणार आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी अख्खे शहर उत्साहात न्हाऊन गेले आहे.

ढोल-ताशांच्या गजरात, सनई-नगा-याच्या सुरावटीत मिरवणुका निघणार आहेत अन् मंडळाचे कार्यकर्तेही बाप्पाच्या स्वागतासाठी भारावून गेले आहेत. यावर्षी मंगलमूर्ती मोरयाच्या स्वागतासाठी जोश, जल्लोष अन् आनंदात कमतरता नाही. गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी झाली असून, बुधवारी (दि.31) गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरात सगळीकडे सळसळता उत्साह अन् चैतन्याची पालवी पाहायला मिळाली.

मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग, देखाव्यांचे अंतिम टप्प्यातील काम करताना कारागीर पाहायला मिळाले, तर गणेशमूर्ती खरेदीसाठी घराबाहेर पडलेले पुणेकर, सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत ओसंडून वाहणारी गर्दी असे चैतन्यपूर्ण वातावरण रंगले होते. बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने दीर्घ काळानंतर शहरभर आनंदोत्सव पाहायला मिळाला. विविध ठिकाणच्या स्टॉलवरून गणेशमूर्ती घरी देताना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करणारे लहानगेही वडिलांसोबत पाहायला मिळाले.

दोन वर्षांनंतर मिरवणुकीचा रंग
सनई-चौघड्यांचे सूर…ढोल-ताशांचा गजर… बँड पथकांचे उत्कृष्ट वादन अन् पारंपरिक वेशभूषेत असलेले कार्यकर्ते असा सोहळा म्हणजे पुण्यातील मिरवणुकीची परंपरा… कोरोनामुळे तो मिरवणुकीचा रंग दोन वर्षे नव्हता. यंदा तोच रंग पुन्हा अनुभवता येणार असून, मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांसह इतर मंडळांच्या मिरवणुका बुधवारी (दि.31) निघणार आहेत. मिरवणुकीनंतर विधिवत अन् पारंपरिक पद्धतीने बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे.

Back to top button