नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. उन्हामुळे वन्यप्राणी व पक्षी पाण्याच्या व निवार्याच्या शोधात असतात. रस्ते अपघातात अनेकदा वन्यप्राण्यांना जीव गमावावा लागला. काही वन्यप्राणी विहिरीत पडतात. त्यांना मदत मिळाली नाहीतर वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. घडलेल्या घटनेची माहिती ठिकाणासह वनविभागाला 1926 या टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जंगलाचे प्रमाण कमी झाल्याने वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आढळून येत आहेत. पाणी, निवारा किंवा अन्नाच्या शोधात स्थलांतर करताना अपघात होतो किंवा वन्यप्राणी विहिरीत पडतात. अशा घटनांची माहिती वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर दिल्यास घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचून वन्यप्राण्यांचा जीव वाचविणे शक्य होईल, असेही वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सामान्य नागरिक, शेतकरी यांनी शेतात किंवा घराच्या आवारात छोटे दगड, बोट, मातीचा वापर करून छोटे आकाराचे पाणवठे तयार करावेत. यामुळे वन्यप्राणी, पक्षी यांना पाणी पिण्याची सोय होईल. तसेच घराच्या गच्चीवर किंवा परसबागेत पक्ष्यांसाठी धान्य ठेवावे. पाणी पिण्यासाठी कुंडे ठेवावेत, जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय होईल, असेही वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. सर्वच वन्यप्राणी हिंसक नसतात. त्यामुळे नागरिकांनी वन्यप्राण्यांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.