नाशिक : आयटी पार्कचे भवितव्य धोक्यात, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून भाजपला दे धक्का | पुढारी

नाशिक : आयटी पार्कचे भवितव्य धोक्यात, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून भाजपला दे धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आडगाव शिवारात 335 एकरवर आयटी पार्क साकारण्यासंदर्भात तयार करण्यात येणार्‍या प्रकल्प अहवालाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याबाबतची फाइल गेल्या एक महिन्यापासून वकिलाकडे पडून आहे. त्याचबरोबर महापालिकेची आर्थिक स्थिती पाहाता गरज, व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता पाहूनच काम करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे, त्यामुळे आयटी पार्कचे भवितव्यही धोक्यात आले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून भाजपला हा दे धक्काच मानला जात आहे.

माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच नाशिक महापालिकेमार्फत आडगाव शिवारात आयटी पार्क साकारण्याबाबतची महत्त्वाकांक्षी योजना मांडली होती. त्या द़ृष्टीने नाशिक शहर, मुंबई, पुणे यांसह इतरही महानगरांमधील आयटी कंपन्या एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी आयटी पार्कसाठी मूलभूत सुविधा देण्याकरिता 20 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. तसेच विविध कंपन्यांना नाशिकमध्ये आमंत्रित करून ना. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटी परिषद आयोजित केली होती. त्यास 100 हून अधिक बड्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. प्रकल्पासाठी जागा मिळावी, यासाठी स्वारस्य अभिदेकार मागविले होते. त्यासाठी शहरातील काही विकासकांनीही होकार कळविल्याने आयटी पार्कसाठी 335 एकर जागा कंपन्यांकरिता उपलब्ध होणार आहे.

आयटी प्रकल्पाचे मॉडेल तयार करण्याच्या द़ृष्टीने तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असता, ठाणे येथील शहा नामक व्यक्तीने अवघ्या एक रुपयात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी दाखविली आहे. परंतु, इतक्या स्वस्तात ठेकेदार प्रकल्प तयार करून देणार असल्याने याबाबत कायदेशीर अभिप्राय मागविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. तसेच प्रकल्पासाठी लागणारी जागा, जागेचा वापर, सहभागी होणार्‍या कंपन्या व जागामालकांना परवडणारे भाडे किती असेल, त्यासंदर्भतील करारनामा, अटी-शर्तींचा भंग झाल्यास काय कार्यवाही असणार, अशा अनेक बाबी तपासण्यासाठी कायदेशीर अभिप्राय मागविण्याकरिता मनपाने आपल्या वकील पॅनलकडे फाइल सादर केली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यात भुजबळांनीही विकासकामे व प्रकल्पांची व्यवहार्यता तपासण्याची सूचना केल्याने आयटी पार्क प्रकल्प बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

जमिनींचे भाव उतरणार
आयटी पार्क होणार असल्याचे नुसते जाहीर होताच आडगाव व परिसरातील जमिनींचे भाव आकाशाला भिडायला सुरुवात झाली होती. 25 ते 30 लाख रुपये एकरी भाव असलेल्या खडकाळ जमिनींना काही दिवसांतच 50 ते 60 लाख रुपये एकरी इतका भाव झाला होता. परंतु, आता आयटी पार्कबाबतच पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आणि टांगती तलवार उभी राहिल्याने जमिनींच्या दरात निर्माण झालेला फुगवटा कमी होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button