नाशिक : हंडाभर पाण्यासाठी बागलाण वासीयांची मैलोन्मैल पायपीट

सटाणा : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. (छाया ः सुरेश बच्छाव)
सटाणा : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. (छाया ः सुरेश बच्छाव)
Published on
Updated on

नाशिक (सटाणा/बागलाण) : सुरेश बच्छाव
बागलाण तालुक्यात नद्यांचे सानिध्य नसलेल्या परिसरातील तब्बल 16 ठिकाणी 10 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे नदीकाठावरील गावांनाही पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हरणबारी आणि केळझरमधील अखेरच्या आवर्तनाकडे बागलाणवासीयांच्या नजरा लागून असल्या, तरी टंचाईच्या झळा चरणसीमेला पोहोचूनही अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडून मंजुरी नसल्याने मोसम व आरमच्या आवर्तनाबाबतची अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील महिलांच्या डोक्यावर हंडा कायम असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चालू वर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभी तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी होती.परंतु बेमोसमी वातावरणामुळे निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि विक्रमी उष्म्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने घटली.त्यामुळे एप्रिलच्या मध्यापासून तालुक्यातील पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले. बघता बघता पंचायत समितीकडे टँकरची मागणी वाढू लागली. हरणबारी, केळझरच्या आवर्तनाने थोडाबहुत दिलासा मिळाला असला तरी त्यानंतर मात्र नदीकाठावरील गावांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. त्यातच नद्यांचे सान्निध्य न लाभलेल्या काही ठराविक भागांतील गावांना मात्र नेहमीप्रमाणे चालू वर्षीही टँकर मागणीशिवाय गत्यंतर उरले नाही. याव्यतिरिक्त नदीकाठावरील तसेच जवळपासच्या गावांमध्येही जलस्रोत घटले असून, त्यामुळे पाणीकपात करणे क्रमप्राप्त ठरले आहे. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई चरणसीमेला पोहोचली असून, हरणबारी व केळझरमधून सोडण्यात येणार्‍या मोसम व आरम नदीतील आवर्तनावर पुढील सगळी भिस्त अवलंबून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालू सप्ताहात आवर्तनासाठी आदेश मिळण्याची अपेक्षा होती. परंतु तसे न झाल्याने टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे लक्ष …

जिल्हाधिकार्‍यांनी आवर्तनाचे आदेश दिल्यास नदीकाठावरील गावांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. परंतु नेहमीच टँकरग्रस्त असलेल्या गावांना मात्र पावसाळा सुरू होऊन नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध होईपर्यंत दुसरा कुठलाही आधार नाही. अनायासेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये सात दिवस आधीच पोहोचणारा मान्सून बागलाणपर्यंतही त्याच गतीने वेळेआधी पोहोचावा, अशी प्रार्थना होत असल्यास नवल ते काय!

दहा टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा …

सद्यस्थितीत 10 टँकरच्या साह्याने रामतीर, रातीर, सारदे, सुराणे, लोणारवाडी, महड, बहिराणे, चिराई, राऊड, वघाणेपाडा, दोध्यानपाडा, नवेगाव, कातरवेल, भिकारसोंडा व मोठे महारदर आदी 16 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. साहजिकच चोवीस तास या सर्व गावांतील ग्रामस्थांच्या नजरा टँकरच्या आगमनाकडे लागलेल्या असतात. हे पाणीही पुरेसे नसल्याने मग अनायसेच आबालवृद्धांना आजूबाजूच्या शेतशिवारात भटकंती करून पाण्याची गरज भागवावी लागते आहे. आराई, ठेंगोडा, नामपूर व आलियाबाद या ठिकाणांहून सद्यस्थितीत टँकरसाठी पाणीपुरवठा होत असून, या जलस्रोतांची पातळी व प्रमाणही घटत चालल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news