नाशिक : दुचाकी घसरून अपघात; जवानाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : दुचाकी घसरून अपघात; जवानाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅम्प येथे कार्यरत असलेला व मूळ बडवेल (आंध्र प्रदेश) येथील 40 वर्षीय जवानाचा शिर्डीला दुचाकीने जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (दि. 22) दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

देवळाली कॅम्प येथे हवालदार असलेला जवान बाळकृष्ण नरसिमल नल्लम (40) हा रविवारी दुपारी होंडा अ‍ॅक्टिव्हा (क्र. एमएच 15 डीजे 7320) या दुचाकीने देवळाली कॅम्पकडून शिर्डीकडे जात असल्याचे सिन्नर पोलिसांनी सांगितले. सिन्नर-घोटी महामार्गावर दुपारी एकच्या सुमारास सोनांबे शिवारात रखमाई लॉन्सजवळ त्यांची दुचाकी घसरून ते पडले. त्यांना तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपचार सुरू असताना या जवानाचे निधन झाले. बाळकृष्ण नल्लम यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. मात्र, हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार नंदू कुर्‍हाडे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news