नाशिक (सायखेडा): पुढारी वृत्तसेवा
तारुखेडले येथील रहीवासी शेतकरी श्री सागर वाळू जगताप यांच्या घराजवळ गट क्र ७ येथे शेडमध्ये बांधून ठेवलेल्या दोन शेळ्यांवर रविवारी दि.29 पहाटे ४ वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये बिबट्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने ग्रामस्थांच्या या प्रश्नाकडे यांनी लक्ष देण्याची व तातडीने पिंजरा लावण्याची विनंती केली आहे. परिसरात जवळच मुळ मुकाई माता मंदिर असून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे भाविकांमध्येही बिबट्याबद्दल दहशत निर्माण झाली आहे. तारुखेडले हे गाव बिबटे प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. गावात बिबट्याचा मुक्त संचार असून तारुखेडले गावात आतापर्यंत दोन चिमुरड्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या आहेत. तसेच शेळ्या मृत्यूप्रकरणी वन विभाग यांनी पंचनामा केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी व ग्रामस्थांनी केली आहे.
"तारुखेडले येथे पहाटे ४ वाजता बिबट्याने शेडमध्ये हल्ला करून दोन शेळ्या मारल्या आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले असून वनविभाग यांनी त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी विनंती करतो." – सागर वाळू जगताप, शेतकरी, तारुखेडले.
"तारुखेडले हे गाव बिबटे प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित आहे. परिसरात नेहमी संध्याकाळी बिबट्यांचा संचार दिसून येतो. त्यामुळे वन कर्मचारी व पिंज-यांची संख्या वाढवणे तसेच जनजागृती करणे अत्यावश्ये झाले आहे. तालुक्यात स्वतंत्र वन कार्यालय होणे गरजेचे आहे, तरच बिबट्याबद्दलची दहशतीची समस्या नियंत्रणात येईल. – प्रशांत गवळी, सामाजिक कार्यकर्ते, तारुखेडले.