![नाशिक शिवसेना,www.pudhari.news](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2FCopy-of-karanataka-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या रविवार (दि.२५)पासून माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेऊन त्यांना उघडे पाडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली.
बागूल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, युवा सेना जिल्हा संघटक दीपक दातीर, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी यांसह पदाधिकारी सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी शिवसेनेतर्फे घेण्यात येत असलेल्या सामाजिक कार्यक्रमासंदर्भात पक्षीय कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर बागूल यांनी शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात मेळावे घेणार असल्याचे सांगितले. त्या नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठीच त्यांच्याविरुद्ध ही मोहीम हाती घेण्यात आली असून, त्यात पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांच्या सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.