नगर : गोदावरी कालव्यांना तीन आवर्तने ; मंत्री विखे पाटील यांच्या सूचना | पुढारी

नगर : गोदावरी कालव्यांना तीन आवर्तने ; मंत्री विखे पाटील यांच्या सूचना

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  गोदावरी लाभक्षेत्रात रब्बी हंगामाकरीता 1 जानेवारी पासून आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उन्हाळी हंगामातील 3 आवर्तनांचे नियोजन मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आ. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आ. लहू कानडे, आ. आशुतोष काळे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता महेश गायकवाड, उपअभियंता सुभाष मिसाळ आदि उपस्थित होते.

सदर बैठकीत गोदावरी धरण समुहातील असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा आधिकार्‍यांनी सादर केला. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने लाभक्षेत्रातील शेती आणि फळबागांसाठी अद्यापही पाण्याची मागणी होत नसल्याचे आधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही चालू रब्बी हंगामात एक आवर्तन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सदर आवर्तन 1 जानेवारी पासून सुरु करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाच्या आधिकार्‍यांना दिल्या आहेत.

आवर्तनापुर्वी चार्‍या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याकरीता आधिकारी कर्मचार्‍यांनी गांभिर्याने करावे, असे निर्देश देतानाच कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यास याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा. तसेच 7 ते 55 कि. मी. पर्यंत माती कामाकरीता शेरे पुर्तता करुन, शासनाकडे अंदाजपत्रक तातडीने पाठवावे. जेणेकरुन कालव्यांची वहनक्षमता मर्यादीत राहून पाण्याचा विसर्ग 550 ते 750 क्सुसेस पर्यंत होईल. यादृष्टीने तातडीने विभागातील आधिकार्‍यांनी कार्यवाही करावी, असे मंत्री विखे यांनी बैठकीत निर्देश दिले.

तीन आवर्तनांचे वेळापत्रक निश्चित

बैठकीत उन्हाळी हंगामाचे नियोजनही गांभिर्यपूर्वक करण्याचे सूचित करून मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उन्हाळी हंगामातील 3 आवर्तनांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे बैठकीत सांगितले. झालेल्या निर्णयाप्रमाणे लाभक्षेत्राला मार्च, एप्रिल आणि मे महिन्या दरम्यान एक आवर्तन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Back to top button