पुणे : विद्युत रोषणाईने उजळले; चर्च ख्रिसमसची तयारी अंतिम टप्प्यात | पुढारी

पुणे : विद्युत रोषणाईने उजळले; चर्च ख्रिसमसची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे; पुढारी वत्तसेवा : विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च… रंगरंगोटीच्या कामाला मिळालेले अंतिम स्वरूप… देखाव्यांच्या तयारीत गुंतलेली तरुणाई अन् कार्यक्रमांच्या नियोजनात व्यग्र असलेले कर्मचारी… अशी तयारी सध्या ख्रिसमसनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये पाहायला मिळत आहे. रविवारी (दि. 25) ख्रिसमस साजरे होणार असून, प्रभू येशू यांच्या जन्मदिनानिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सायंकाळी वॉच नाइट उपासना तर ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये सकाळी उपासना (भक्ती) होणार असून, याचसोबतच चर्चमध्ये आनंद गीतांच्या (कॅरल गीते) सादरीकरणासह दिवसभर विविध कार्यक्रमही होणार आहेत. ख्रिसमसला अवघे काही दिवस उरल्यामुळे शहरातील चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ख्रिसमसचा सण साधेपणाने साजरा झाला. पण, यंदा ख्रिसमस उत्साहात साजरा होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली असून, शहरातील चर्चमध्ये खास तयारी करण्यात आली आहे. रंगरंगोटी, आकाशकंदील, विद्युत रोषणाई अन् फुलांच्या सजावटीने चर्चला एक वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी देखावेही तयार करण्यात आले आहेत.

हिंदुस्थानी मेथडिस्ट चर्चचे रेव्हरंड राजेंद्र पापाणी म्हणाले, ख्रिसमसची तयारी झाली असून, ख्रिसमसच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता भक्ती होणार आहे. तर आनंद गीतांचे (कॅरल गीते) सादरीकरण, संदेश, लहान मुलांचा नृत्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होतील. यंदा ख्रिसमसनिमित्त समाजबांधवांमध्ये उत्साह आहे.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात ते रात्री आठ या वेळेत वॉच नाइट उपासना होणार आहे. तर ख्रिसमसच्या दिवशी सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत भक्ती असणार आहे. यानिमित्ताने समाजबांधव चर्चमध्ये येऊन भक्तीत सहभागी होणार असून, एकमेकांना शुभेच्छा देऊन समाजबांधव ख्रिसमस साजरा करणार आहेत.

            – रेव्हरंड पराग लोंढे, ब्रदर देशपांडे मेमोरिअल चर्च (कसबा पेठ)

Back to top button