नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

ओझर : दहावा मैल चौफुली येथे सुरु झालेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  (छाया : मनोज कावळे)
ओझर : दहावा मैल चौफुली येथे सुरु झालेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  (छाया : मनोज कावळे)

ओझर : पुढारी वृत्तसेवा

मोठ्या प्रमाणात रहदारीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शहराजवळील दहावा मैल चौफुलीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याबाबत पुढारीने वृत्त प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या चोवीस तासांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दहावा मैल चौफुली बनली मृत्यूचा सापळा या शीर्षकाखाली पुढारीने येथील या रस्त्यावरील खड्ड्याची दखल घेत पाठपुरावा केला हाेता. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने ठेकेदार नियुक्त करीत हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत पिंपळगाव-गोंदे हा सहापदरी रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून, या महामार्गावर चोवीस तास वाहतूक असते. याच चौफुलीवरून विमानतळावर जाण्याचा मार्ग असल्याने अनेक व्हीआयपी, केंद्रीय, राज्यातील मंत्री नाशिक येथे येत-जात असतात. विशेष म्हणजे पिंपळगाव टोलनाक्यावर जात असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नसावे का याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व टोल प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. दरम्यान, सतर्कता म्हणून पोलिसांनी येथे बॅरिकेड्स‌ लावले होते. दरम्यान, खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पथदीपही झाले सुरू : काही दिवसांपासून याच महामार्गावरील पथदीपदेखील बंद होते. तसेच महाविद्यालय समोरील बोगद्यातील हायमास्ट, उड्डाणपूल व सर्व्हिस रोडवरील पथदीपही बंद होते. ते पथदीपदेखील सुरू करण्यात आले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news