नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सहकारी साखर कारखाना पळसे संचलित मे. दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या कारखान्याचा 2022-23 या गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी (दि.21) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवराज संभाजीराजे, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
गेली नऊ वर्षे बंद असलेला नाशिक साखर कारखाना खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून सुरू होत आहे. 2022 मध्ये कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर व्यवस्थापन व प्रशासनाने मशिनरी दुरुस्तीसह शेतकी विभागामध्ये सक्षम ऊसतोड यंत्रणा कार्यान्वित करीत इतरही योग्य ते बदल करून कारखाना चालू गळीत हंगामासाठी सज्ज केला आहे. या हंगामात 3.50 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. चालू गळीत हंगामाचा बॉयलर 8 ऑक्टोबर रोजी पेटविल्यानंतर गळीत हंगामाचा प्रारंभ 21 ऑक्टोबरला होत असून, या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार सुहास कांदे, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सरोज आहिरे, आ. हिरामण खोसकर, जिल्हा बँक प्रशासक अरुण कदम, सीइओ शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील, कारखाना अवसायक बबनराव गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत. गळीत हंगामाच्या प्रारंभास शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, कामगार व इतर घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन खा. हेमंत गोडसे, संचालक दीपक चंदे, शेरझाद होशी पटेल, सागर हेमंत गोडसे, कार्यकारी संचालक सुकदेव काशीनाथ शेटे आदींनी केले आहे.