नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'तू आवडत नाही' अशी कुरापत काढून पत्नीच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने निर्घृणपणे वार करीत खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिरामण निवृत्ती बेंडकुळे (३०, रा. जयभवानी वस्ती, नाणेगाव) असे या आरोपीचे नाव आहे. हिरामण याने २५ जानेवारी २०२० रोजी रात्री घरात झोपलेल्या पत्नी काजलचा खून केला होता.
काजल आणि हिरामण बेंडकुळे यांचा विवाह झाल्यानंतर हिरामणने पत्नी काजलला चांगली दिसत नाही, अशी कुरापत काढून माहेरी पाठवले होते. त्यानंतर त्याची समजूत काढून तिला सासरी पाठवल्यानंतर किरकोळ कारणावरून हिरामण काजलला मारहाण करीत असे. त्याने २५ जानेवारी २०२० रोजी रात्री दहाच्या सुमारास कुरापत काढून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याचे चार-पाच घाव घालत खून केला.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी हिरामणला खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा तसेच २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक जे. व्ही. गुळवे, अंमलदार डी. बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.