

सातारा : पुढारी वृत्तसेवा; सातारा शहरातील काही शाळांमधीलच मुले आपल्या मित्रांच्या मदतीने लहान शाळकरी मुलांना टार्गेट करून धमकावत, मारहाण करत १०० रुपयांपासून त्यांच्याकडून खंडणी उकळाउकळी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचा व्हिडीओ एका टोळक्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर टाकून दहशत निर्माण केली आहे. शहरातील ही घटना समोर आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस कारवाईकडे लक्ष लागले आहे. (Satara extortion case )
साताऱ्यात समोर आलेल्या व्हिडीओ क्लिपमधील मुलगा इयत्ता नववीचा आहे. शाळेव्यतिरिक्त या मुलाने बाहेर खासगी क्लास लावला आहे. यातून पीडित मुलाचे त्या क्लासमधील दोन नव्याने मित्र झाले आहेत. संबंधित दोन्ही मुलांनी पीडित मुलाची माहिती घेतल्यानंतर क्लास बाहेरील त्यांच्या मित्रांकरवी त्यांनी त्या मुलाला दोन महिन्यांपूर्वी पैशांची मागणी केली. 'पैसे दिले नाही तर तुला बदडून काढतो. आमची गँगआहे. ती गँग खतरनाक आहे,' असे सांगून ७ ते ८ जण असलेल्या मुलांच्या टोळक्याने भीती घातली. या धमकीने शाळकरी मुलेही खंडणी प्रकरणात पीडित मुलगा घाबरला व त्याने १०० रुपये दिले. यातून या टोळक्याला चटक लागली व त्यांनी वेळोवेळी खंडणी उकळण्यास सुरुवात केली.
चार दिवसांपूर्वी मात्र पीडित मुलाला याच ७ ते ८ जणांच्या टोळक्याने पुन्हा पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने या टोळक्याने पीडित मुलाला भररस्त्यावर मारहाण करत त्याचा व्हिडीओ तयार केला. हाच व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर टाकला. तो व्हिडीओ व्हायरल होत होत पीडित मुलाच्या पालकांकडे आला. आपल्या मुलाला इतर काही मुले मारहाण करत असल्याचा व्हिडीओ पाहून ते हादरुन गेले. मुलगा गेल्या काही महिन्यांपासून घाबरण्याचे कारण, जखमांचे व्रण कशाचे होते? हे त्यांच्या लक्षात आले. अखेर सुज्ञ पालकांनी मुलाशी संवाद साधला. नेमका प्रकार विचारुन घेत त्याला बोलते केले. मुलाला धीर दिल्यानंतर त्या दोन महिने सुरु असलेल्या घटनेची माहिती दिली.
पीडित मुलगा घाबरल्याचे पाहून टोळक्याने त्या मुलाला वारंवार पैशांची मागणी करत दमबाजी केली. पैसे नाही म्हटल्यावर टोळक्याने पीडित मुलाला घरातील वस्तूही चोरून आणण्यास सांगू लागले. मुलाने त्याला नकार दिल्यानंतर टोळक्याने पीडित मुलाच्या हातावर धारदार वस्तूने कापले. घरी याबाबतची माहिती दिली तर जीवे मारण्याची धमकी मुलाला दिली. यातूनच गेल्या दोन महिन्यांत पीडित मुलाने खंडणीबहाद्दर टोळीला रोख रक्कम व काही वस्तू दिल्या आहेत.