नाशिक : शिंगाडा तलाव येथे दोन गटांत दगडफेक, व्यावसायिकांचा अघोषित बंद

नाशिक : शिंगाडा तलाव येथे दोन गटांत दगडफेक, व्यावसायिकांचा अघोषित बंद
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिंगाडा तलाव परिसरात गुरुवारी (दि. ६) रात्री एका व्यावसायिकाचा कामगारासोबत वाद झाला होता. त्याचे पर्यावसन शुक्रवारी (दि. ७) दुपारी 1 च्या सुमारास दोन गटांतील हाणामारीसह दगडफेकीत झाले. त्यामुळे परिसरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविल्याने परिसरात शुकशुकाट बघावयास मिळाला.

शिंगाडा तलाव परिसरात कार डेकोरेटर्ससह इतर व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये मोठ्या संख्येने तरुण कामाला आहेत. कामगार तरुणांची स्वतंत्र युनियन आहे. एका व्यावसायिकाचा कामगारासोबत किरकोळ वाद झाला होता. तणावग्रस्त कामगाराला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा एका गटाने केला. कामगार युनियनने शुक्रवारी (दि. ७) बंदची हाक दिली होती. बंद ठेवलेली दुकाने सामंजस्याने उघडण्याचा निर्णय होताच बाहेरून आलेल्या व्यक्तींनी केलेल्या मध्यस्थीच्या दाव्यातून वाद उफाळून आला. दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक केल्याने परिसरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

दगडफेकीची माहिती मिळताच, आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त नितीन जाधव, डॉ. सीताराम कोल्हे, सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, विजय ढमाळ, दिलीप ठाकूर, तुषार अढावू आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. दरम्यान, या दगडफेकीत विनोद सुभाष थोरात (५०, रा. तिवंधा चौक, जुने नाशिक), राहुल दिलीप राऊत (३०, रा. शिंगाडा तलाव) आणि कौशल संजय वाखारकर (२८, रा. मखमलाबाद) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दगडफेक प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून काेयता हस्तगत केला आहे.

व्यावसायिक आणि कामगार यांच्यातील आपसातील वाद आहे. दगडफेक प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. या घटनेला धार्मिक किनार नाही. दोन्ही गटांतील संशयितांचा शोध घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

-किरणकुमार चव्हाण, उपआयुक्त

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

शिंगाडा तलाव येथील प्रकार हा व्यावसायिक कामगार यांच्यातील वादाचा आहे. या प्रकरणाला कुठेही धार्मिक रंग नाही, त्यामुळे सोशल मीडियांवरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात अफवा पसरविल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिस ठाण्याबाहेर गर्दी

मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसह व्यावसायिक आणि कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी केली होती. त्यानंतर राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही दाखल झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवून घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव निघून गेला.

जिल्हा रुग्णालयात ठिय्या

मुंबई नाका पोलिस ठाण्यातून निघालेला एक जमाव थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊन धडकला. रुग्णलयाच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी जमावाने केली. त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. हल्लेखोरांना अटक न केल्यास 'नाशिक बंद'चा इशारा जमावाने दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर जमाव माघारी फिरला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news