Nashik : सिन्नर तालुक्यात दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा, हल्ल्यात दाम्पत्य जखमी
नांदूरशिंगोटे/वावी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी अशा दोन ठिकाणी दरोडेखोरांना सशस्त्र दरोडा टाकल्याच्या घटना शुक्रवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास घडल्या. दापूर येथे काकड वस्तीवर राहणाऱ्या आव्हाड कुटुंबावर पहाटे साडेतीनच्या सुमारास तर तत्पूर्वी दोडी शिवारात दोन ते अडीचच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे सवादोन लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरुन नेला.
दापूर येथील घटनेत पाच ते सहा हजार हजारांची रोकड व पाच तोळे सोन्याचे दागिने, 25 भार चांदी असा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
दापूर रस्त्यालगत असलेल्या काकड वस्तीवर शुक्रवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान घरामध्ये अचानकपणे 3 ते 4 दरोडेखोर कोयता, चाकू, टॉमी आदी शस्त्रांसह शिरले व त्यांनी घरात झोपलेल्या सुनील छबू आव्हाड (42) व त्यांच्या पत्नी सविता सुनील आव्हाड (37), लहान मुलगा, आई किसनाबाई छबु आव्हाड (65) यांच्यावर हल्ला केला. किसनाबाई यांच्या गळातील ताईत व सोन्याचे मनी काढून घेत त्यांना दमदाटी करुन गप्प बसविले. त्यानंतर सुनील आव्हाड यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यांच्या कानाजवळ धारदार शस्त्राने वार केल्याने कानाचा काही भाग तुटला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना बेशुद्ध करून शेजारी झोपलेल्या त्यांच्या पत्नी सविता आव्हाड यांच्या तोंडाला रुमाल लावून आरडाओरड केल्यास मारुन टाकण्याची धकमी दिली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, टॉप्स, चेन, जोडवे व इतर ऐवज चोरट्यांनी पळविला. एका कानातील टॉप्स निघत नसल्यामुळे चोरट्यांनी त्यांचा अर्धा कान कापल्याने त्या जखमी झाल्या. सविता आव्हाड या प्रतिकार करत असताना काही उपयोग झाला नाही. चोरटे ऐवज घेऊन फरार झाले. सुनीता यांनी पती सुनील आव्हाड यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यानंतर मोबाईलवरुन घडल्या प्रकाराची माहिती नांदूरशिंगोटे येथील माहेरच्या माणसांना दिली. आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी राहणारे लोक जमा झाले, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
घडलेला प्रकार नांदूर पोलिसांना कळविल्यानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर, सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामाही करण्यात आला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान, जखमींना नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुनील आव्हाड यांना गंभीर दुखापत झालेली असल्यामुळेे डॉ. संतोष सानप, स्नेहल सानप, पल्लवी सानप तसेच डॉ. सोनी यांनी उपचार केले. आव्हाड यांच्या डोक्याला व कानाला 50 टाके टाकण्यात आले. सविता आव्हाड यांनाही कानाला दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दवाखान्यामध्ये जखमींचा जबाब नोंदविला. सहाय्यक निरीक्षक लोखंडे पुढील तपास करीत आहेत.
दोडीत महिलेच्या कानातील दागिने ओरबाडले
वावी दुसरा दरोडा दापूर-दोडी रस्त्यावर दोडी शिवारात भारत बन्सी सदगीर यांच्या वस्तीवर रात्री अडीच वाजेच्या सुमारास पडला. दरोडेखोरांनी सदगीर यांच्या घराच्या मागच्या बाजूने दरवाजाची कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या भारत सदगीर व ताई सदगीर यांना धक्काबुक्की व मारहाण केली. ताई सदगीर यांच्या कानातील सोन्याचे अडीच तोळ्याचे दागिने ओरबाडल्याने कानाला जखम झाली. तर भारत सदगीर यांना लोखंडी रॉडने डोक्यात व पाठीत मारहाण केली. यानंतर जवळच असलेल्या सदगीर वस्तीजवळ असलेल्या बाळू विठ्ठल केदार यांच्या घराचा सेफ्टी डोअर तोडून घरात प्रवेश केला. मात्र, आतील दरवाजा न तुटल्याने पडवीत असलेल्या लोखंडी सामानाची पेटी घेऊन चोरटे निघून गेले. तसेच रस्त्याने तात्याबा दामोदर आव्हाड यांच्या वस्तीवर जाऊन घराचा आतील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आव्हाड कुटुंबीय जागे झाल्याने त्यांनी आरडाओरडा केली असता चोरट्यांनी तेथून पोबारा केला. जखमी कुटुंबीयांना नांदूरशिंगोटे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
हेही वाचा :
- पुणे : मर्चंट नेव्हीत काम करणार्या तरुणाचे अपहरण
- विसापुरात चारचाकीसह दोन मोटारसायकली पेटविल्या
- आजचे राशिभविष्य (दि.८ जुलै २०२३)