नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव विभाग व परिसरात प्रभागाच्या चारही बाजूस पाण्याचे जलकुंभ असून ते पूर्णतः भरत नसल्याने ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे मनपाने या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा परिसरातील महिलांचा हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे शहर अधीक्षक अभियंता चव्हाणके, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, पाणी पुरवठा गोकुळ पगारे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव विभाग येथे प्रभागाच्या चारही बाजूस पाण्याचे जलकुंभ असून ते पूर्णपणे भरत नाही. परिणामी महिलांना ऐेन उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. इतर अनेक प्रभागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होतो. परंतु येथील प्रभाग क्र.31 मध्ये अशी परिस्थिती का? प्रभाग क्र.31मध्ये चहू बाजूने मुकणे धरणाची व गंगापूर धरणाच्या पाण्याचे जलकुंभ असूनही पुरेशा प्रमाणात पाणी नाही म्हणजे "घागर उशाशी तहान घशाशी" अशी परिस्थिती प्रभागातील नागरिकांची झालेली आहे. तरी आपण लवकरात लवकर पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा प्रभागातील सर्व महिलांना सोबत घेऊन दालनात आंदोलन अथवा महिलाचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा निवेदना्दवारे देण्यात आला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 31 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्यासह तकदीर कडवे, विशाल आहेर, नितिन बच्छाव, मोहित पन्हाळे उपस्थित होते.