Stock Market Closing | सेन्सेक्स १२८ अंकांनी घसरून ६१,४३१ वर बंद, निफ्टी १८,१५० च्या खाली | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्स १२८ अंकांनी घसरून ६१,४३१ वर बंद, निफ्टी १८,१५० च्या खाली

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असतानाही आशियातील निर्देशांकांच्या बरोबरीने भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी आज गुरुवारी तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीला सेन्सेक्स ३९४ अंकांनी वाढून ६१,९५४ वर गेला होता. तर निफ्टी १८,२०० वर होता. त्यानंतर निर्देशांकांनी हे तेजी गमावली. आज सेन्सेक्स १२८ अंकांनी घसरून ६१,४३१ वर बंद झाला. तर निफ्टी ५१ अंकांच्या घसरणीसह १८,१२९ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

‘हे’ शेअर्स वधारले

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, कोटक बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक हे शेअर्स वाढले. तर टाटा मोटर्स, आयटीसी, एम अँड एम, एसबीआय, सन फार्मा, पॉवर ग्रिड, एलटी, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले. आज निफ्टी मेटल १.१९ टक्के वाढला. निफ्टी फायनान्सियल ०.८४ टक्के वधारला. बँकिंग, ऑटो, FMCG, मीडिया, फार्मा, consumer durables आणि हेल्थकेअर यांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

बँकिंग शेअर्समध्ये ‘हे’ होते टॉप लूजर्स

बँकिंग शेअर्समध्ये Bank of Baroda आणि कॅनरा बँक हे टॉप लूजर्स होते. बँक ऑफ बडोद्याचा शेअर २ टक्क्यांनी घसरून १८२ रुपयांवर आला. तर कॅनरा बँकेचा शेअर १.९० टक्के घसरून २९६ रुपयांवर आला. Indian Overseas Bank, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र हे शेअर्सदेखील घसरले.

संबंधित बातम्या

SBI Q4 Results : नफ्यात ८३ टक्के वाढ

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मार्च अखेरच्या तिमाहीत स्टँडअलोन निव्वळ नफ्यात ८३ टक्के वाढ नोंदवली असून तो १६,६९५ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत SBI चा नफा ९,११३ कोटी रुपये होता. बँकेच्या बोर्डाने मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर ११.३० रुपये लाभांश जाहीर केला आहे. असे असून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India Share Price) चा शेअर सुमारे २ टक्के घसरून ५७१ रुपयांवर आला.

FII भारतीय शेअर्सचे निव्वळ खरेदीदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर्सचे निव्वळ खरेदीदार बनले आहेत. त्यांनी बुधवारी १४९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, FII ने मे महिन्यात २८,३३५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे.

तेलाच्या किमतीत घट

गुरुवारी तेलाच्या किमती कमी झाल्या. कच्च्या तेलाच्या किमतीत मागील सत्रात सुमारे ३ टक्के वाढ झाली होती. ब्रेंट क्रूड फ्युचर्स २४ सेंट्सने घसरून दर प्रति बॅरेल ७६.७२ डॉलरवर आले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड २१ सेंट्सने घसरून ७२.६२ डॉलवर आले. बुधवारी तेलाची मागणी आणि अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाटाघाटीच्या आशेने दोन्ही बेंचमार्क सुमारे ३ टक्के वाढले होते. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २ पैशांनी वाढून ८२.३५ वर पोहोचला.

जागतिक बाजारातील स्थिती

जागतिक बाजारावर नजर टाकली असता बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजार वाढून बंद झाले. S&P 500 निर्देशांक १.२ टक्क्यांने वाढला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) निर्देशांक १.२ टक्के आणि नॅस्डॅक (Nasdaq composite) १.३ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, आशिया-पॅसिफिक शेअर निर्देशांक गुरुवारी वाढले. जपानचा निक्केई निर्देशांक (Nikkei) २० महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजे ३०,६६७ वर पोहोचला. हाँगकाँगचा हँग सेंग ( Hong Kong’s Hang Seng) ०.९३ टक्के वाढला. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

Back to top button