नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील पोलिस भरतीमुळे हजारो उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठीची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारांकडून नव्याने प्राप्त झालेल्या सात हरकतींवर पोलिस अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल जाहीर झाल्याने आता मैदानाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दि. 1 ते 10 फेब्रुवारीत नव्याने सात हरकती प्राप्त झाल्या. नव्याने प्राप्त हरकतींमध्ये मैदानी गुणपत्रिकेत होमगार्ड उल्लेख नाही, एनसीसी प्रमाणपत्रासमोर 'हो' असा उल्लेख नाही, मैदानी चाचणीतल्या गुणांबाबत नोंदविलेले आक्षेप यांचा समावेश होता. यासंदर्भात अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही करून त्याचे कारणासह स्पष्टीकरण उमेदवारांना दिले आहे. सातपैकी तीन उमेदवारांच्या हरकतींवर दुरुस्ती झाली. तर, उर्वरित उमेदवारांनी गुणांबाबत नोंदविलेल्या हरकतींवरून अधिकृत नोंदी अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केल्या आहेत. त्यावर कार्यवाही करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे रखडलेली गुणवत्ता यादी लवकरच उमेदवारांना समजणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय निवडलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील.
राज्यात लेखी परीक्षा एकाच वेळी
नाशिक ग्रामीणच्या 164 शिपाई पदांसाठी 18 हजार 935 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 11 हजार 204 उमेदवार चाचणीस पात्र ठरले. दि. 2 ते 20 जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. चालकांच्या 15 जागांसाठी दोन हजार 114 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मैदानी चाचणीअंती एक हजार 22 उमेदवारांपैकी 196 पात्र ठरले. त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात आली व त्यांची गुणवत्ता यादीही जाहीर झाली. मात्र, 164 शिपाई पदांसाठीच्या मैदानी चाचणीची अंतिम यादी रखडल्याने पुढील कार्यवाहीला विलंब होत आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे. अद्याप बृहन्मुंबईसह इतरत्र उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण न झाल्याने लेखी परीक्षाही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.