नाशिक: सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर | पुढारी

नाशिक: सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा 19 वा कार्यक्षम विधिमंडळ सदस्य पुरस्कार 2021-22 वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर झाला. याबाबतची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, डॉ. धर्माजी बोडके, अ‍ॅड. अभिजित बगदे, संजय करंजकर, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर उपस्थित होते. 50 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार आ. बा. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जे. पी. गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, नीलम गोर्‍हे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, खा. नितीन गडकरी या मान्यवरांना देण्यात आला आहे. स्व. माधवराव लिमये हे पत्रकार, लेखक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील कार्यक्षम कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ समाजवादी नेते होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावाना दरवर्षी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यापैकी एका सदस्याची निवड कार्यक्षम आमदार-खासदार पुरस्कारासाठी करण्यात येते. दरम्यान, आ. देवयानी फरांदे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, पत्रकार जयप्रकाश पवार, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. आर्चिस नेर्लीकर, प्रा. दिलीप फडके, डॉ. धर्माजी बोडके यांनी पुरस्कार निवड समितीची जबाबदारी पार पाडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार असून, त्याची घोषणा लवकर करणार असल्याचे सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा:

Back to top button