नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने 160 वी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम रामशेज किल्ल्यावर राबविली. या मोहिमेत दिवसभर भरपावसात केलेल्या श्रमदानात रामशेजवरील चोरखिंड द्वारासमोरील मोठ्या टाक्यांतील दगड, गोटे बाहेर काढण्यात आले.
श्रमसत्रात किल्ल्याच्या मोकळ्या मध्यभागी लावण्यात आलेल्या 100 चाफ्याच्या कलमांना झुडूपमुक्त करून रोपांना आळे करण्यात आले. तसेच दुर्गजागृती अभियानातून दुर्गपाहणीसाठी आलेल्या पर्यटक, विद्यार्थी, गडप्रेमींना रामशेजच्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती देण्यात आली. गड सुरक्षित, अभ्यासपूर्ण कसा बघावा, याबद्दल शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ यांनी सर्वांना माहिती दिली. शिवकार्यच्या दुर्गसंवर्धकांनी मुसळधार पावसातही श्रमदान केले. त्यानंतर जुन्या राममंदिरात अखेरच्या सत्रात दुर्गसंवाद करण्यात आला. यावेळी राज्य व केंद्र शासन, वन, राज्य, केंद्र पुरातत्त्वला जागे करण्यासाठी राज्यस्तरीय किल्ले वाचवा आंदोलन केले जाणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मोहिमेत श्रमदान समितीचे प्रमुख भूषण औटे, किरण उदार, जयराम बदादे, रवि माळेकर, देवराम निपळुंगे आदी सहभागी झाले होते.