तासगाव; प्रमोद चव्हाण : विकास म्हणजे रस्ते उकरणे, गटारी करणे, जुन्याच कामांना मलमपट्टी करणे, अशीच कामे तासगाव शहरात सुरू असलेली दिसतात. यामुळे गेली अनेक वर्षे विकासाच्या पोकळ आशेवर शहरातील जनता आहे.
तासगाव तालुका हा जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग आहे. विटा, खानापूर, भिवघाट, आटपाडी या भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असल्यास तासगावमधूनच जावे लागते. मात्र शहरातील अरुंद रस्ते, जुनी रचना यामुळे शहरातून एका वेळेला दोन वाहने जाणे देखील मुश्किल ठरते. दुसरीकडे गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेला रिंगरोड पूर्ण होणे आता धूसर वाटू लागला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे गेल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहेत. अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत काहीच दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे शहरातून जाण्याशिवाय पर्याय नाही.
या रिंगरोडवरील साधे खड्डे भरण्याची देखील तसदी घेतली नसल्याचे दिसते. खासदार संजय पाटील व आमदार सुमनताई पाटील या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग होतो. मात्र आश्वासनांचा पाऊस पाडण्याशिवाय या प्रतिनिधींनी काहीही केले नसल्याची शहरातील नागरिकांची भावना आहे.
खासदार पाटील यांनी 5 वर्षांपूर्वी तहसीलदार कार्यालयामध्ये बैठक घेऊन हा रिंगरोड पूर्ण करण्याबाबत चर्चा केली होती. यानंतर मात्र अवघ्या काही दिवसात तो थंडावला.
दुसरीकडे आमदार पाटील यांनी देखील या विषयात कधीच रस दाखवला नाही. शहरातील विटा नाका ते सांगली नाका, विटा नाका ते पुणदी रस्ता, भिलवडी नाका ते कॉलेज चौक या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे. यामुळे अनेकांचे अपघातही झाले आहेत. मात्र लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत
आहे.