मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क – स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava death) यांचे दिल्लीत निधन झाल्याची पुष्टी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना छातीत दुखू लागल्याने आणि कोसळून पडल्याने त्यांना १० ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. (Raju Shrivastava death)
लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
राजू यांच्या भावाने सांगितले होते की, राजूला या हॉस्पिटलमधून थेट त्याच्या घरी घेऊन जायचे आहे. राजू यांच्या तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे म्हटले जात होते की, लवकरच कॉमेडियनचे कुटुंबीय त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवतील. पण, ती केवळ अफवा होती.
राजू व्हेंटिलेटरवर होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते. दीपूने असेही सांगितले होते की, डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढण्याचा अनेकवेळा विचार केला. परंतु, वारंवार ताप येत असल्याने डॉक्टरांना हे करणे शक्य होत नव्हते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नव्हते.