बिबट्या आणि बछडे  www.pudhari.news
बिबट्या आणि बछडे www.pudhari.news

नाशिक : पाळीव कुत्र्यांची शिकार करत ‘ती’चा बछड्यांसह मुक्तसंचार

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा
विठेवाडी-भऊर शिवारातील शिवनाला भागात मादी बिबट्याचा व बछड्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सध्या कांद्याला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करत आहे. आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज वीजपुरवठा होतो. परिणामी, भर थंडीत शेतकर्‍यांना शेतात रात्र काढावी लागते. त्यात अंधारात दबा धरून बसणार्‍या बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या तीन – चार दिवसांपासून भऊर, विठेवाडी शिवारातील शिवनाल्याजवळील दयाराम बोरसे यांच्या शेतालगत असलेल्या कोरओव्हळ भागात बिबट्याचा मुक्काम असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. काल रात्री बिबट्याने शेतकरी दिलीप निकम यांच्या घराजवळ बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. या गोंधळात कुटुंबीयांना जाग आल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. बिबट्याने या भागातील पाळीव कुत्र्यांची शिकार केली आहे. विठेवाडी – भऊर रस्त्यालगत नाल्यात पोल्ट्री व्यावसायिक मृत कोंबड्या फेकतात. त्यामुळे जंगली प्राण्यांना आयते खाद्य मिळते, त्यामुळेच तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे. या बाबतीत वनविभागाने तत्काळ दखल घेऊन शिवनाल्याच्या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news