पुणे : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार | पुढारी

पुणे : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती.

सदर कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. यासाठी श्री. पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा असे निर्देश या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button