नाशिक : गोदावरी नदीत गटारांचे सांडपाणी

नाशिक : गोदावरी नदीपात्रात सांडपाणी सोडण्यात येत आहे. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : गोदावरी नदीपात्रात सांडपाणी सोडण्यात येत आहे. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीपात्रात नाशिक शहरातील अनेक ठिकाणांहून एक दोन नव्हे, तर तब्बल 50 पैकी 10 गटारांतून सांडपाणी तसेच मलजल सोडण्यात येत असल्याची बाब आयुक्तांसह अधिकार्‍यांच्या पाहणीतून समोर आली आहे. यासंदर्भात आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित गटारे तातडीने बंद करून भूमिगत गटारांना जोडण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्त रमेश पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आपले प्राधान्य असेल, असे वक्तव्य केले होते. त्यानुसार आयुक्तांनी गोदावरी सुशोभीकरण व प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने अनेक उपक्रम व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पवार यांनी बुधवारी (दि.1) अहिल्यादेवी होळकर पूल ते जलालपूर, गोवर्धन मनपा हद्दीपर्यंत बोटीने, पायी तसेच वाहनाद्वारे अधिकार्‍यांसोबत पाहणी केली. या दौर्‍यात सुमारे 50 ठिकाणी गटारांचे पाइप थेट नदीत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. 50 पैकी 10 ठिकाणी मलजल नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. गंगापूर मलजल शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर शेती, उद्योग तसेच उद्यानांसाठी करण्यात येणार आहे. पाहणी दौर्‍यात शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, अग्निशमन दलप्रमुख एस. के. बैरागी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, उपअभियंता नितीन राजपूत, संजय आडेसरा, स्मार्ट सिटी विभागाचे कानडे आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी केल्या या सूचना
लेंडी नाल्यातील मलजल हे स्मार्ट सिटीअंतर्गत चालू असलेल्या 900 मीटर व्यासाच्या मलनिस्सारण वाहिनीत वळविण्याची सूचना त्यांनी केली. साळुंखे क्लासेस येथील मलजलमागील डाव्या तटावरील बाजूची मलवाहिका रामवाडीच्या मुख्य रस्त्यावरील मलवाहिकेस जोडणे, मल्हारखाण येथील मलजल गोदावरी नदीच्या उजवीकडील मलनिस्सारण वाहिनी दुरुस्त व मजबुतीकरण करून त्याला जोडणे, चोपडा नाला पुलाच्या दोन्ही बाजूचे मलजल हे पंपिंग स्टेशनमधील मलजल उपसा केंद्रात वळविणे, परीचा बाग येथील पावसाळी नाल्यातील ड्रेनेजचे पाणी बंद करणे, जुन्या पंपिंग स्टेशनपासून गोदावरी नदीवरील पुलावरून जाणारी रायझिंग मेन पुढे तपोवन मलजल शुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकणे, आसारामबापू पुलाजवळील सांडपाणी लगतच्या 24 मीटर डीपी रस्त्यालगत नवीन ड्रेनेज लाइन टाकून त्याला जोडणे, चिखली नाल्यातील एमआयडीसीचे व मलजलचे पाणी जवळील मलनिस्सारण वाहिनीची चेंबर दुरुस्ती करून त्यात वळविणे, आनंदवली नाल्याचे ड्रेनेजचे पाणी पंपिंग करून जवळील मलनिस्सारण वाहिनीत टाकणे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news