पोलिसांच्या सतर्कतेने चौंडीचा संभाव्य गोंधळ टळला | पुढारी

पोलिसांच्या सतर्कतेने चौंडीचा संभाव्य गोंधळ टळला

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा

चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती सोहळ्यात पोलिस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतल्याने संभाव्य गोंधळ रोखता आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमावरून भाजप- राष्ट्रवादी असा वाद सुरू झाला.

त्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी चौंडी येथे जाऊन सभा घेणार असल्याचे जाहीर केल्याने पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाकडून चौंडी येथे गोंधळ होणार असल्याचा अहवाल दिल्याने नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी परिस्थितीचा आढावा घेत मायक्रो प्लानिंग केले.

मोठी बातमी : हिंदूंच्या हत्यांनंतर काश्मीरमधून पंडितांसह हिंदूंचे स्थलांतर सुरू

आमदार पडळकर हे कुठून कसे चौंडी येथे येणार आहेत, याची अगोदरच माहिती काढली गेली. 30 मे रोजी पोलिस यंत्रणेच्या साध्या वेशातील एका पथकाने वाल्हे (जेजुरी) गाठले. तिथे आ. पडळकर ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांत सामील झाले. आ. पडळकर सकाळी लवकरच जेजुरीच्या दिशेने निघाले.

कार्यकर्त्यांच्या ताफ्यात पोलिस यंत्रणेची एक गाडी होती. पडळकर यांच्या ताफ्यात साध्या वेशातील पोलिस असल्याने मिनिटा-मिनिटांची हालचाल वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मिळत होती. आ.पडळकर कोणत्या मार्गे हे चौंडी येथे येणार हे नक्की झाल्याने पोलिस यंत्रणेने चापडगाव येथे मोठा पोलिस बंदोबस्त उभा केला.

भाजप कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍याचा विनयभंग प्रकरण

पडळकर यांच्या गाड्यांचा ताफा चापडगाव येथे पोहोचताच त्यांना तिथेच रोखण्यात आले. जवळपास दीड तास पडळकर यांना रोखून धरण्यात आले. खासदार शरद पवार यांची सभा संपल्यानंतर आ. पडळकर यांना जाऊन देण्यात आले. पोलिस यंत्रणेने संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन जी खबरदारी घेतली, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

योग्य नियोजन गरजेचे
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले, राज्यातील नेते जयंती कार्यक्रमाला येणार असल्याने पोलिस यंत्रणा अलर्ट होती. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील , पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली. आम्ही जे नियोजन केले ते यशस्वी झाले.

Back to top button