Nashik Saptashrungigad : एसटी महामंडळाला सप्तशृंगी पावली! चैत्रोत्सवात पावणेदोन कोटींचे उत्पन्न

Nashik Saptashrungigad : एसटी महामंडळाला सप्तशृंगी पावली! चैत्रोत्सवात पावणेदोन कोटींचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी चैत्रोत्सवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंहळाच्या लालपरीला पसंती दिली होती. चैत्रोत्सवात प्रवासी वाहतूकसेवेमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, तिजोरीत तब्बल १ कोटी ६७ लाखांची भर पडली. सप्तशृंगीदेवी पावल्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा सप्तशृंगगडावर दि. ३० मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नांदुरी पायथा ते सप्तशृंगगड या ११ किलोमीटरच्या घाटरस्त्यावरील प्रवासी वाहतूकसेवा केवळ एसटी महामंडळाकडे सोपविण्यात आली होती. खासगी वाहनांची वाहतूक ही विशेष अधिसूचनेद्वारे बंद करण्यात आली होती. गडावर जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.

दरम्यान, संपूर्ण चैत्रोत्सवात नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी एसटी बसलाच परवानगी असल्याने भाविकांनी लालपरीला प्राधान्य दिल्याचे चित्र होते. चैत्रोत्सवात तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. त्यात प्रौढ (२,७४,३१६), लहान मुले (१७,२९२), महिला (२९,०५६), ज्येष्ठ नागरिक (१८,२५६), अमृत योजना लाभार्थी (६,१२२) आदींचा समावेश होता. यात्रोत्सवात कुठेही दुर्घटना न घडल्याने एसटी प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

प्रवासी संख्या : ३ लाख ४५ हजार

एसटीचा प्रवास : २ लाख ९६ हजार किमी

मिळालेले उत्पन्न : १ कोटी ६७ लाख

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news