नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत

नाशिक मनपा,www.pudhari.news
नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील अग्निशमन विभागाबरोबरच आरोग्य वैद्यकीय विभागातील एकूण ७०६ पदांच्या भरतीची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार आहे. भरतीसंदर्भातील सेवाप्रवेश नियमावलीला नगरविकास विभागाने आधीच मंजुरी दिली असून, मनपातील उर्वरित दोन हजार पदांच्या भरतीच्या अनुषंगाने शासनाकडे प्रलंबित असलेल्या सेवा प्रवेश नियमावली मंजूर करण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत.

गेल्या १० ते १२ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सरळसेवा पद भरतीला अखेर मुहूर्त लागल्याने बेरोजगार तरुणांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. भरतीसाठी राज्य सरकारने टीसीएस आणि आयबीपीपीएस या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. दोनपैकी एका कंपनीकडून भरती केली जाणार आहे. नाशिक शहराचा वाढता विस्तार पाहता सुविधा देण्याकरता मनपाचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी होत होती. परंतु, प्रशासकीय खर्चाची मर्यादा भरतीच्या आड येत होती. महापालिकेत 'क' वर्गाच्या संवर्गाचे ७०८२ इतकी पदसंख्या आहे. मात्र, यापैकी जवळपास अडीच हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत, तर अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आजमितीस केवळ साडेचार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच एक एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन पदांचा पदभार आहे.

नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. मात्र २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंजुरीअभावी नगरविकास विभागाकडेच पडून होती. ही बाब निदर्शनास आणून दिल्यनंतर नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर करून भरतीचा मार्ग मोकळा करून दिला.

गट ब, क आणि ड या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार असून, ही भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टिंग सव्हिसेस (टीसीएस), इन्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या दोन संस्थांमार्फत राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. दोनपैकी एका कंपनीमार्फत महापालिका भरती प्रक्रिया राबविणार असून, त्याबाबतचे आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे.

अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभागातील पद भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील जवळपास दोन हजारांहून अधिक पदांच्या भरतीबाबतचे सेवा प्रवेश नियमावलीदेखील मंजुरीचे आदेश नगरविकास विभागाला दिले आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत याबाबतही कार्यवाही सुरू होईल.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news