बारामती : ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून ऊस तोडणी कामगाराच्या मुलाचा मृत्यू | पुढारी

बारामती : ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून ऊस तोडणी कामगाराच्या मुलाचा मृत्यू

बारामती; पुढारी वृत्तसेवा : उसाच्या फडात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ऊस तोडणी कामगाराच्या आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील ढाकाळे येथे ही घटना घडली. चेतन संजय सोनवणे (मूळ रा. टेकवडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. ट्रॅक्टरचालक अर्जुन नाना मोरे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माळेगाव पोलिस ठाण्यात त्याचे वडील संजय भिका सोनवणे यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि. 21) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढाकाळे गावच्या हद्दीत प्रकाश रासकर यांच्या शेतजमीन गट क्रमांक 245 मध्ये ही घटना घडली. सोनवणे हे ऊसतोडणी कामगार आहेत. त्यांची टोळी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी आलेली आहे. टोळी मुकादम देवेश्वर लक्ष्मण नेरपगार यांचा ट्रॅक्टर (एमएच 19 डीव्ही 0384) असून त्यावर अर्जुन नाना मोरे (रा. पारोळा, जि. जळगाव) हा चालक आहे.

घटनेदिवशी चेतन हा उसाच्या फडामध्ये होता. फिर्यादी पत्नीसह ऊसतोड करत होते. दुपारी टोळीतील भगवान सोनवणे यांचा जोराचा आरडाओरडा ऐकून फिर्यादी तिकडे गेले असताना त्यांचा मुलगा चेतन हा निपचित पडला होता. त्याच्या अंगावर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेले होते. चालक अर्जुन मोरे याने वाहन पुढे-मागे करताना चेतन त्याखाली आला. त्याला तत्काळ उपचारासाठी बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अर्जुन मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Back to top button