नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा
अतिवृष्टीमुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह बागायत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना फळबागेसाठी हेक्टरी 1 लाख व खरीप पिकांना हेक्टरी 50 हजारांची भरपाई देण्याबरोबरच पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, असे साकडे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना घातले.
गुरुवारी (दि.25) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेतली. बागलाणमध्ये ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. मका, बाजरी, सोयाबीन, नागली, पालेभाज्या आदी खरीप पिके पाण्याखाली गेल्याने ती वाया गेली आहेत. तसेच काढणीवर आलेल्या डाळिंबावर तेल्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यावरील उत्पादनखर्चदेखील भरून निघाला नाही. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची व्यथा या पेक्षा वेगळी नाही. बागलाणमध्ये दरवर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर हंगाम पूर्व द्राक्ष पीक घेतले जाते.त्यासाठी साधारणपणे हेक्टरी पाच लाख रुपये खर्च होतो. यंदा हे पीक फुलोर्यावर असताना अतिवृष्टीचा फटका बसला. फळकूज होऊन यंदाचा हंगामच वाया गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे आमदार बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले. द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना शासनाने हेक्टरी एक लाख व खरीप पिके आणि पालेभाज्यांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाई देण्याबरोबरच पीककर्ज व वीजबिल माफ करावे, अशी मागणी केली.
कांद्याला अनुदान द्यावे
यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकर्यांनी कांदा चाळीत भरून ठेवला. मात्र, बाजारभाव सुधारण्यापूर्वीच कांदा चाळीतच खराब होऊन शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावा, असादेखील विषय यावेळी मांडण्यात आला.