पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची विविध कार्यालये, मिळकती, दवाखाने व उद्यानांच्या सुरक्षेचे काम करणार्या सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिले गेेले नसल्याची बाब पुढे आली आहे. सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणार्या ठेकेदार कंपनीवर तातडीने कडक कारवाई करावी. तसेच, सुरक्षारक्षकांचे थकित वेतन विनाविलंब अदा करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना विचारणा केली आहे. तसेच यापुढे सर्व सुरक्षारक्षकांचे वेतन ठरलेल्या वेळेत मिळेल याची महापालिकेने व्यवस्था करावी, अशी सूचना केली आहे.
त्यांनी याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्याने, कार्यालयांची सुरक्षा करण्यासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. या खासगी कंपनीने कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. त्याचे पैसे महापालिकेकडून संबंधित ठेकेदाराला वेळच्या वेळी दिले जात आहे. मात्र, ठेकेदार कंपनी सुरक्षारक्षकांना वेळेवर वेतन देत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून हे वेतन थकित आहे. त्याचप्रमाणे मार्च 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम देखील कंपनीने सुरक्षारक्षकांच्या खात्यात जमा केली नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
कंपनी सर्व सुरक्षारक्षकांना कामगार कायद्याअंतर्गतचे कोणतेही लाभ देत नाही. नियमानुसार वेतनवाढही करत नाही. या विरोधात सुरक्षारक्षकांनी महापालिकेच्या अधिकार्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. काहींनी आंदोलनही केले आहे. तरीही महापालिका प्रशासन दबावापोटी योग्य कार्यवाही करत नसल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे. सुरक्षारक्षकांना पगार वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे. तसेच यापुढे त्यांना दरमहा वेळेवर वेतन मिळण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून तातडीने कार्यवाही करण्यात यावी.