नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज

नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज
Published on
Updated on

नाशिक : बाणगंगेच्या तीरावरुन : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : सचिन बैरागी

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये मनमाड शहरासाठी सुरू असलेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणीयोजना, धर्मवीर आनंद दिघे 78 खेडी पाणीपुरवठा योजना तसेच नांदगाव शहरासाठी गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही मंजूर झालेली आहे. यामुळे नांदगाव, मनमाड शहरासह ग्रामीण भागातील पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु पिण्याच्या

पाण्याबरोबरच शेतीसाठी एखाद्या सिंचन प्रकल्पाची गरज नांदगाव तालुक्याला आहे. शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
नांदगाव तालुक्यात दहेगाव, माणिकपुंज, नागासाक्या, गिरणा अशी छोटी-मोठी धरणे आहेत. यात दहेगाव धरण नांदगाव शहरासाठी राखीव आहे. परंतु दहेगाव धरण हे नियमितपणे भरत नसल्याने माणिकपुंज धरणातूनही नांदगाव शहरासाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. तसेच माणिकपुंज, कासारी, जळगाव बु. जळगाव खु., पोही, कसाबखेडा, चांदोरा, न्यायडोंगरीसह चाळीसगाव तालुक्यातील गावांना या धरणाचा सिंचनासाठी उपयोग होतो. नाग्या-साक्या आणि गिरणा धरणाचा तालुक्यातील काही ठराविक गावांनाच सिंचनासाठी उपयोग होतो. ही धरणे नांदगाव तालुक्यातील असली तरी या धरणातील पाण्याचा फायदा नांदगावकरांपेक्षा इतर तालुक्यांना जास्त होतो. धरणांशेजारील काही गावे सोडता बाकी गावांच्या सिंचनाचा प्रश्न जैसे थे आहे. तालुक्यात शेतकर्‍यांकडून मका, कांदा, कपाशी, बाजरी, गहू यासारखी प्रमुख पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र, शेतीसाठी सिंचन प्रकल्प नसल्याने ऐन रब्बी हंगामातच शेतकर्‍यांना पाणीटंचाई जाणवते. यामुळे तालुक्यात उन्हाळ बागायती क्षेत्र फार कमी आहे. काही वर्षांपूर्वी नारपार (दमणगंगा) प्रकल्प योजनेचे पाणी नांदगावकरांसाठी यावे यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षांनी एकत्रित येत यासाठी पाठपुरावाही केला होता. परंतु या प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याच्या समावेशाबाबत साशंकताच असल्याने नांदगावकरांच्या अपेक्षांवर पाणी पडते की काय, हा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्याने पिण्याचा प्रश्न गंभीर वाटत नसला, तरी नांदगाव तालुक्यात मोठे जलसाठे नसल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले तर लवकरच पाणीटंचाई जाणवते. तसेच भविष्यातील दृष्टीने तालुक्यात मोठ्या सिंचन प्रकल्पाची गरज तालुक्यातील शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

तालुक्यातील शेती पीक क्षेत्र
तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र : एक लाख 10 हजार हेक्टर.
बागायत क्षेत्र :  10 ते 11 हजार हेक्टर.
कोरडवाहू क्षेत्र : 51,000 हेक्टर
उन्हाळी क्षेत्र : 5,800

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news