

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील पवना धरणात रविवार (दि.28) पर्यंत एकूण 26.35 टक्के पाणी साठा आहे. ते पाणी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतके आहे. पावसाने ओढ किंवा हुलकावणी दिल्यास पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीची वेळ येऊ शकते. महापालिका पवना धरणातून पाणी उलचून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करते. पवना नदीवरील रावेत बंधारा येथून पाणी उचलून सध्या शहराला दररोज 510 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्फीभवन होत आहे.
त्यामुळे पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात बुडालेले मंदिर, टेकड्या दृष्टीस पडत आहेत. तसेच, धरणात जमा झालेला गाळ शेतकरी ट्रकमध्ये काढून नेत आहेत. ती माती आपल्या शेतीमध्ये टाकली जात आहे. कडक उन्हामुळे पवना धरणात सध्या 26.35 टक्के इतका पाणी साठा उरला आहे. हा साठा जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतका आहे. या स्थितीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी न लावता तो लांबल्यास हा पाणी साठा कमी पडू शकतो.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका, मावळातील काही नगरपालिका व एमआयडीसीवर पाणी कपातीची वेळ येऊ शकते. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी 26.82 टक्के इतका पाणी साठा धरणात होता. पवना धरणात सध्या केवळ 26.35 टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. पावसाने जर ओढ दिल्यास शहरातील पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असे पवना धरणाचे अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.