Nashik : नांदूरमध्यमेश्वरला विदेशी पाहुण्यांची चाहूल

Nashik : नांदूरमध्यमेश्वरला विदेशी पाहुण्यांची चाहूल
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. दरवर्षी साधारणत: सप्टेंबरअखेरपासून विदेशी पक्षी नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी सर्वदूर पाऊस झाल्याने तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून गारवा निर्माण झाल्याने विदेशी पक्ष्यांच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच अभयारण्यातील किलबिलाट वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील हजारो पक्ष्यांचे आगमन होत असते. युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका, शेजारील आशियाई देशातून मोठ्या संख्या पक्ष्यांचे स्थलांतर चालू असते. यामध्ये थापट्या, गढवाल, तरंगपक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, पिनटेल कोंबडक, मुर हेन, छोटा मराल, ऑस्प्रे, काईट, मार्श हॅरिअर, ईगल, पेटेंड स्टोर्क, प्लासगल, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, स्पून बिल, स्पोटेड ईगल आदींचा समावेश असतो. विदेशी पक्षी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.

सध्या काळा शराटी, मोठा पाणकावळा, खंड्या, सुगरण, जांभळा बगळा, चित्रबलाक, मुग्धबलाक, शेकाट्या, वारकरी, तरंग, गडवाल, तलवार बदक आदी स्थानिक पक्षी अभयारण्यात दिसून येत आहेत. तर हरियाल, चमचा, कांडेसर, लाल डोक्याचा बदक, चक्रवाक, थापट्या, भुवई, चक्रांग आदी पक्ष्यांची प्रतीक्षा कायम आहे. यंदा पावसाळ्यातच फ्लेमिंगोचे दर्शन झाल्याने पक्षी हंगामात त्यांची संख्या वाढणार असल्याने पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

यंदा सर्वत्र चांगला पाऊस होत असून, स्थलांतरित पक्ष्यांना मार्गातच अन्न आणि पाण्याची व्यवस्था उपलब्ध होत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विदेशी पाहुण्यांची चाहूल लागली आहे. लवकरच स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
– शेखर देवकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news