पानशेत धरणाजवळ अज्ञात व्यक्तीचा खून | पुढारी

पानशेत धरणाजवळ अज्ञात व्यक्तीचा खून

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत धरण भागातील आंबेगाव बुद्रुक (ता. वेल्हे) येथे अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तो मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार बुधवारी (दि. 12) दुपारी उघडकीस आला. पानशेत धरण भागातील पानशेत- शिरकोली रस्त्यावर आंबेगाव बुद्रुक गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यापासून पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे जाणार्‍या रस्त्यालगत गजेंद्र पवार यांच्या जागेत बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला. याची माहिती वेल्हे पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर पोलिस जवान अजयकुमार शिंदे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी रक्ताचे डाग तसेच गोधडी सापडली आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. खून झालेल्या अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षे आहे. उंची 172 ते 175 सेंमी आहे. त्याच्या अंगात निळसर रंगाचा फूल बाह्यांचा टी शर्ट आहे. राखाडी रंगाची फूल पॅन्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवेअर आहे. एका हातावर चित्र व इंग्रजी आर अक्षराचा टॅटू आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने मृतदेह सडला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार म्हणाले, या व्यक्तीचा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आडबाजूला फेकून दिला आहे. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. त्याच्या शरीरावरील टॅटू तसेच कपड्यांवरून ओळख पटविण्यासाठी ठिकठिकाणी शोध मोहीम सुरू आहे.

Back to top button