बारामती : ऊस वाहतुकीत नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई; अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचा इशारा | पुढारी

बारामती : ऊस वाहतुकीत नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई; अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचा इशारा

बारामती; पुढारी वृत्तसेवा: साखर कारखान्यांचे गळीत सुरू होत आहे. हंगामामध्ये ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे अपघाताचे प्रकार घडतात. अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी पोलिस व आरटीओकडून प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय नियमांचे उल्लंघन करून ऊस वाहतूक केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिला. मोहिते यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 13) साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक तसेच वाहतूक नियंत्रक यांची बैठक घेण्यात आली. बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर हे यावेळी उपस्थित होते.

मोहिते म्हणाले की, सहकारी, खासगी साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसंबंधी घालून दिलेल्या नियमांचे पालन होते आहे का याकडे लक्ष द्यावे. ट्रॅक्टर- ट्रेलर, ट्रकच्या वाहनचालकांनी वाहन चालविताना वैध परवान्याची प्रत जवळ ठेवणे बंधनकारक आहे. ट्रेलर चालकाच्या परवान्यात अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. तसेच ट्रकचालकाच्या परवान्यावर ट्रान्सपोर्ट वाहनासंबंधीचा उल्लेख आवश्यक आहे. एकावेळी दोनपेक्षा अधिक ट्रेलर ओढून नेऊ नयेत. ट्रेलरची एकत्रित लांबी 18 मीटरपेक्षा अधिक असता कामा नये.

असे आढळून आल्यास कारवाई करून दंड आकारण्यात येईल. ट्रॅक्टर- ट्रेलरद्वारे ऊस वाहतूक करताना चालकासोबत सहायक असणे बंधनकारक आहे. साखर कारखान्याच्या हंगामावेळी अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागतो. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साखर कारखान्यांनी या कामी पोलिस, आरटीओ विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी नियमांची माहिती देत उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

ऊस वाहतूकदारांना आवाहन
ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीने ऊस वाहतूक करताना सेवारस्त्याचा वापर करावा.
ट्रॅक्टर- ट्रेलरच्या मागे लाल रंगाचा दिवा रात्रीच्या वेळी प्रज्वलित करावा.
वाहनांच्या नंबर प्लेट सुस्पष्ट दिसतील अशा लावाव्यात.
कर्णकर्कश आवाजात चालकांनी गाणी लावू नयेत.
ऊस वाहतूक करताना चालकांनी मोबाईलवर बोलू नये, हेडफोन लावू नयेत.
वाहनांची वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत.
निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक करू नये.

Back to top button