

सिडको : राजेंद्र शेळके : महापालिकेने नवीन प्रभागरचना जाहीर केली आहे. सिडकोतील जुना प्रभाग 25, प्रभाग 26 व प्रभाग 28 यातील परिसराचा समावेश होऊन, त्यात कामटवाडे गावाचा समावेश असलेला नवीन प्रभाग 32 तयार झाला आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी शिवसेनेचे श्यामकुमार साबळे व भाजपच्या विद्यमान नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी प्रभाग क्रमांक 32 मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपकडून माजी नगरसेवक अनिल मटाले यांसह या प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसकडून माजी नगरसेवक अण्णा पाटील, तर मनसेमधून माजी नगरसेविका कांचन पाटील यांचे पती नामदेव पाटील यासह इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर इच्छुकांचे लक्ष आता आरक्षणाकडे लागले आहे.
नवीन प्रभाग क्रमांक 32 मध्ये सिडको वसाहत तसेच कॉलनी भागाचा समावेश आहे. प्रभागात रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, उद्याने विकसित कामे झाली आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासह विकासकामे झाली आहेत. भाजपच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनीही या प्रभागातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रभाग 32 मध्ये कसमा तसेच खानदेश भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असल्याने निवडणुकीत हे मतदान निर्णायक ठरते. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे लक्ष आरक्षण कसे राहील, याकडे लागले आहे.
या भागात विकासकामे झाली असली तरी इंद्रनगरी भागातील काही अंतर्गत रस्त्यांची समस्या आहे. कोकण भवन, दुर्गानगर भागात उद्याने विकसित झाली. परंतु लहान तसेच मोठ्यांना खेळण्यासाठी या भागात मैदाने नाहीत. शिवशक्ती चौकातील उघड्या विद्युत तारा भूमिगत न केल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच या भागात ड्रेनेजचीही समस्या आहे. एकूणच, प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. तर, दुसरीकडे इच्छुकांचे लक्ष प्रभाग आरक्षणाकडे लागून आहे.
प्रमुख इच्छुक उमेदवार
श्यामकुमार साबळे, पवन मटाले, भूषण देवरे, प्रकाश अमृतकर, चित्रा अमृतकर, साधना मटाले, प्रदीप पताडे. भाग्यश्री ढोमसे, दिनेश मोडक, अनिल मटाले, गणेश अरिंगळे, किरण गाडे, राकेश ढोमसे, हेमंत नेहेते. अरुण निकम, किरण शिंदे, अर्चना शिंदे, राहुल कमानकर. अण्णा पाटील, भरत पाटील, अनिता मोरे. नामदेव पाटील, अरुणा पाटील, कामिनी दोंदे, उदय मुळे. सुमित शर्मा.
असा आहे प्रभाग
कोकण भवन, शिवतीर्थ कॉलनी, ज्ञानपीठ परिसर, शिवशक्ती चौक, शनि मंदिर परिसर, सरस्वती चौक, कामटवाडे रोड, धन्वंतरी कॉलेज, सप्तशृंगी माता मंदिर, तुळजा भवानी माता मंदिर, त्रिमूर्ती पोलिस चौकी, अभियंतानगर, अंबिकानगर, इंद्रनगरी.
शिवशक्ती चौक व परिसरात उघड्या विजेच्या तारा आहेत. दोन वर्षांपूर्वी या भागात उघड्या विजेच्या तारांचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला होता. शिवशक्ती चौक व परिसरातील उद्यड्या विजेचा तारा भूमिगत केल्या पाहिजे. – सुरेश नाईक , रहिवासी
कोकण भवन, दुर्गानगर ते त्रिमूर्ती चौकापर्यंत उद्याने विकसित केली आहे. परंतु, लहान मुलांसह मोठ्यांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. या भागातील मुलांना खेळण्यासाठी दुसरीकडे जावे लागते. या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने उभारली पाहिजेत. – मनोहर शिंदे, रहिवासी