नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा गणवेश एकाच रंगाचा

नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा गणवेश एकाच रंगाचा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश खरेदीसाठी प्रशासनाला जाग आली असून, राज्य शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी 600 रुपयांप्रमाणे एक कोटी पाच लाख रुपयांचे अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही विशिष्ट पद्धतीच्या गणवेश खरेदीसाठी एका अधिकार्‍याने आग्रह धरल्याची बाब मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एकाच रंगाचा ड्रेसकोड असण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

गणवेशाकरिता कापड वा शिलाईचे काम शालेय व्यवस्थापन समितीने वेळेत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी सांगितले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार तसेच गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट व सॉक्स या वस्तू मोफत पुरवल्या जातात. गणवेश तर सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिले जातात. मात्र, ही गणवेश खरेदी दरवर्षी वादात सापडते. कोरोनामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला गेला. मनपाच्या 101 शाळांमधून 29 हजार 954 विद्यार्थी शिक्षण घेतात. गणवेशाकरिता शासन अनुदानपात्र 19 हजार 995 इतके विद्यार्थी असून, याव्यतिरिक्त नऊ हजार 800 विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील तसेच ओबीसी व अल्पसंख्याक समाजाचे आहेत. या विद्यार्थ्यांना देखील मनपाकडून गणवेश दिला जातो. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. या अधिकाराद्वारे विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे गणवेश खरेदीची समितीची जबाबदारी आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन समितीकडूनच याबाबत हलगर्जीपणा केला जातो. काही विशिष्ट ठेकेदारांना हाताशी धरून गणवेश खरेदी केली जाते. यंदाही तोच कित्ता गिरवला जात असल्याची माहिती समजताच आयुक्तांनी एकाच रंगाचा गणवेश खरेदी करण्याचे फर्मान सोडले आहे. स्थानिक पातळीवर निकृष्ट दर्जाचे कापड खरेदी झाल्यास शाळा व्यवस्थापन समितीवर कारवाईचे अधिकार शिक्षण विभाग व शिक्षण समितीला आहे. तसेच स्थानिक नगरसेवकांकडूनही शालेय गणवेश आणि शालेय साहित्य खरेदीवरही लक्ष राहत असते. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीवर वचक निर्माण झाला आहे.

मनपाच्या शाळा : 101
विद्यार्थी : 29 हजार 954
अनुदानपात्र विद्यार्थी : 19 हजार 995

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news