

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
गुुरुवारी सकाळपासून ऊन असताना दुपारी अचानक दाखल झालेल्या पावसाने शहर आणि परिसराला झोडपून काढले. पावसाला वादळी वार्याची जोड मिळाल्यामुळे शहापूर, बसवण कुडची भागात पडझड झाली. शहराच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाल्याने स्मार्ट रस्त्यांवर फूटभर पाणी तुंबून होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. शहापूरमध्ये घराचे छप्पर कोसळले. त्यातून वृद्धा थोडक्यात बचावली. शहरासह तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या अनेक भागांतही पाऊस आणि सोबत गारांचा माराही झाली.
केरळसह काही राज्यांत मान्सून दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत बेळगावातही मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी आकाश निरभ्र होते; पण दुपारी अडीचच्या सुमारास ढग दाटून आले आणि 3 वाजता पावसाला सुरुवात झाली. पाऊण तास कोसळलेल्या पावसामुळे शहर परिसरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. त्यामुळे बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. आजच्या पावसामुळे शहरात पुन्हा दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते. याशिवाय टिळकवाडी, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली परिसरात पाणी तुंबून राहिले.
स्मार्ट सिटी योजनेतील अशास्त्रीय कामांमुळे रस्त्यात पाणी तुंबून होते. त्याचा लोकांना त्रास सहन करावा लागला. जुने बेळगाव, गोवावेस, चन्नम्मा सर्कल, युनियन जिमखाना रोड, रामदेव गल्ली तसेच शहापूर, वडगाव आदी भागात असलेल्या सखल भागात पाणी तुंबले होते. पंधरा दिवसानंतर पहिल्यांदाच पाऊस लागल्यामुळे गटारीतील घाण रस्त्यावर आली होती. केएलई रुग्णालयासमोर आणि जुने बेळगाव येथील रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते.
वादळी वार्यामुळे बसवण कुडची येथे पाच झाडे कोसळली. तर बागलकोट रस्त्यावर सहा झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. झाडे हटवल्यानंतर वाहतुकीला मार्ग मिळाला. झाडाची फांदी अंगावर पडल्याचे एक महिलाही जखमी झाल्याचे समजते. येथील स्मशानभूमीतील दाहिनीवरील पत्रे उडाले. गणेशमूर्ती कार्यशाळेच्या छताचे पत्रे उडाले. दोन झाडे विद्युत ट्रान्स्फॉमर्रवर पडल्यामुळे वाहिन्या तुटल्या असून गावात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा ठप्प होता.
वादळी वार्यामुळे बसवाण गल्ली शहापूर येथील धामणेकर कुटुंबीयांच्या घरावरील छत कोसळले. घरात शालन धामणेकर या 84 वर्षांच्या वृद्धा होत्या. त्या सुदैवाने बचावल्या. नगरसेवक रवी साळुंखे व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहणी केली. शासनाकडून भरपाई मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. अर्धा तास पावसाने झोडपून काढले. सध्या शेती मशागतीची कामे आटोपली असून शेतकरी भात पेरणीसाठी तयारीत आहेत. मान्सूनपूर्व पावसाचा त्यासाठी लाभ होईल.