

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये 'स्मार्ट स्कूल' प्रकल्पाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असताना, आता महापालिकेच्या अंगणवाड्याही 'स्मार्ट' होणार आहेत. क्वालिटी सिटी अभियानांतर्गत या प्रकल्पासाठी २० अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या अंगणवाड्यामंध्ये डिजिटल बोर्डासह स्मार्ट साहित्य पुरविले जाणार असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
क्वालिटी सिटी अभियानाचे समन्वयक तथा महापालिकेचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. क्वालिटी सिटी अभियानांतर्गत समावेश असणाऱ्या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयात नुकतीच पार पडली. यात मनपाच्या अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीची इमारती असलेल्या तसेच विद्यार्थी संख्या ५० हून अधिक असलेल्या २० अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. या अंगणवाड्यांमध्ये डिजिटल बोर्ड, दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देता येणारे स्मार्ट शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक खेळ आदी साहित्य पुरविले जाणार असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याप्रसंगी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे जितूभाई ठक्कर, क्वालिटी सिटीचे समन्वयक तथा उपआयुक्त प्रशांत पाटील, नाशिक सिटिझन फोरमचे आशिष कटारिया, नाशिक इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेटचे विक्रम सारडा, हेमंत राठी, आयएमएचे डॉ. श्रेया कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, सचिन अहिरराव आदी उपस्थित होते.
क्वालिटी वॉर्ड तयार करणार
क्वालिटी सिटी अभियानांतर्गत शहरात क्वालिटी वॉर्ड तयार केले जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती स्वरूपा सुरवसे यांनी या बैठकीत दिली. ४५०० बांधकाम कामगारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. संदीप कुयटे यांनी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाबाबत, तर स्वरूप यांनी होम कंपोस्टिंगबाबत माहिती दिली.
इंदूरच्या धर्तीवर रोडमॅप
क्वालिटी सिटी मिशन ही नाशिक शहरात एक लोकचळवळ बनावी व त्यातून नाशिक शहर इंदूर शहराच्या धर्तीवर एक सुंदर शहर बनावे यासाठी रोडमॅपनुसार काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त केला गेला. तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था, नागरिक यांनी अभियानात योगदान देण्याचे आवाहन केले गेले.
हेही वाचा :