आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कधी होणार निवृत्त? | पुढारी

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कधी होणार निवृत्त?

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर सहा-सहा महिने राहून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. विशेषतः अमेरिका आणि रशियाकडून संचालित होत असलेल्या या स्थानकावर अनेक देशांचे अंतराळवीर गेलेले आहेत. हे अंतराळ स्थानक 2030 पर्यंत कार्यरत ठेवण्याचा ‘नासा’चा विचार आहे. त्यानंतर ते प्रशांत महासागरातील एका दूरस्थ भागात क्रॅश केले जाईल. या ठिकाणाला ‘पॉईंट निमो’ असे म्हटले जाते.

‘आयएसएस’ हे पृथ्वीच्या खालील कक्षेत असलेले सर्वात मोठे मॉड्यूलर अंतराळ स्थानक आहे. 20 नोव्हेंबर 1998 मध्ये ते लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत या स्थानकावर अनेक मोहिमा काढण्यात आलेल्या आहेत. ‘नासा’ने म्हटले आहे की व्यावसायिक रूपाने संचालित अंतराळ प्लॅटफॉर्म वैज्ञानिक संशोधनाचे स्थळ म्हणून ‘आयएसएस’ची जागा घेतील. ‘नासा’ मुख्यालयातील वाणिज्यिक अंतराळ विभागाचे संचालक फिल मॅकएलिस्टर यांनी सांगितले की खासगी क्षेत्रात ‘नासा’च्या सहाय्याने वाणिज्यिक निम्न-पृथ्वी कक्षेतील स्थळांना विकसित आणि संचालित करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाने आणि वित्तीय स्वरुपाने सक्षम आहोत.

आजपर्यंतचा आमचा असे स्थानक संचालित करण्याचा अनुभव व शिकलेल्या गोष्टी खासगी क्षेत्राशी ‘शेअर’ करण्यास आम्ही तत्पर आहोत. यामुळे त्यांना अंतराळात सुरक्षित, विश्वसनीय आणि प्रभावी गुंतवणूकीचे गंतव्य स्थान विकसित करण्यास मदत मिळेल. निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागराती निर्जन क्षेत्रात पाडले जाईल. जानेवारी 2031 मध्ये ते कक्षेच्या बाहेर असेल.

Back to top button