

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पारंपरिक माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच आधुनिक युगातील रिल्सचा वापर करून जनजागृती झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दृष्य स्वरूपात दिसू शकेल, या भावनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेने (शिंदे गटा) च्या वतीने 'रिल्स सुपरस्टार' या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.
देशवासीयांमध्ये देशभक्ती तसेच मराठी अस्मितेचा जागर व्हावा, आपल्या शहराचे ज्ञात – अज्ञात पैलू लोकांसमोर यावेत, कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि या निमित्ताने प्रत्येकात दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना स्मार्ट फोन, इअर बड्स, स्मार्ट वॉच अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. 'हम हिंदुस्थानी' देशभक्तीपर रिल्स, 'जय जय महाराष्ट्र माझा' अर्थात मराठी अस्मिता, मराठी परंपरा, मराठमोळी वेशभूषा, खाद्यसंस्कृती दर्शविणारे रिल्स, 'कलर्स ऑफ नाशिक' अर्थात नाशिक पर्यटन, निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळे, संस्कृती वैभव, स्वच्छ नाशिक या संकल्पनांवर आधारित रिल्स, 'आई पण भारी देवा' अर्थात मुलांनी आईसोबत, कुटुंबासमवेत बनवलेले रिल्स, 'असा मी आसामी' अर्थात सोलो डान्स, गायन, वक्तृत्व आदी कलाविष्कार या विषयांवर बनवलेल्या रिल्सच्या आधारे या स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, आय टी सेल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख उपस्थित होते.
या ठिकाणी पाठवा रिल्स
स्पर्धकांनी आपले रिल्स व्हिडिओ 9529413833 या व्हॉट्सॲप नंबरवर दि. १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ पर्यंत पाठवावे. नंतर येणाऱ्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. नाशिक शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते अपलोड करण्यात येतील. ज्या रिल्सला सर्वाधिक लाइक्स आणि व्ह्यूज असतील त्यांचा बक्षीस देताना प्राधान्याने विचार केला जाईल.
हेही वाचा :