नाशिक (देवळा) : सोमनाथ जगताप
देवळा येथील बौद्धवासी काकासाहेब सोनवणे यांचे मानस पुत्र महेश बच्छाव याने रस्त्यावर सापडलेले 1 लाख 80 हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल व्यापा-याकडून देऊ केलेले बक्षिस देखील नाकारल्यामुळे देवळा शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा येथे शनिवारी दि. ४ रोजी सटाणा येथील ठेपचे व्यापारी बाळासाहेब राका यांनी त्यांच्याकडे कामगार असलेल्या मुलाला देवळा येथील स्वामी समर्थ किराणा दुकानाचे व्यापारी सोनजे यांच्याकडे असलेली बाकी घेण्यासाठी पाठवले होते. सोनजे यांनी कामगाराकडे असलेली मालाची बाकी १ लाख ८० हजार रुपये दिले. त्यांनतर कामगार मुलगा हे पैसे घेऊन दुचाकीने सटाण्याच्या दिशेने जात असतानाच देवळा येथील ऍग्रो मॉलसमोर रस्त्यावर हे पैसे पडले. त्याने बरेच अंतराने दूर गेल्यावर पैसे रस्त्यावर पडल्याचे त्याच्या उशीरा लक्षात आल्यावर तो घाबरला. त्याने पुन्हा देवळ्याला येऊन व्यापारी सोनजे यांना तुम्ही मला दिलेले पैसे रस्त्यातच पडल्याचे सांगतिले. त्यांनाही काय करावे ते समजेना. त्यानंतर देवळा येथीलच महेश बच्छाव यांना रस्त्यात पडलेले पैसे सापडले. ते जवळच आर. के. प्रोव्हिजनमध्ये काही वस्तू घेण्यासाठी आले असता गावातील पैसे हरवल्याची चर्चा ऐकली. त्यांनी ताबडताेब पैसे सापडल्याचे सांगितले. त्यामुळे आर. के. मॉलचे संचालक कैलास शेवाळकर यांच्या मध्यस्तीने ठेप व्यापारी बाळासाहेब राका व कामगाराला बोलावून घेतले व त्यांना सापडलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले. बच्छाव यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. महागाईच्या काळातही पैसे सापडल्याबद्दल आणि ते प्रमाणिकपणे परत केल्याबद्दल संबंधित कामगारकडून देण्यात येणारे बक्षीस देखील बच्छाव यांनी नाकारल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.