पुणे : काम सुरू असलेली गटाराची भिंत कोसळली | पुढारी

पुणे : काम सुरू असलेली गटाराची भिंत कोसळली

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या जेजुरी रेल्वे स्थानकासमोर सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे काम सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच आत्तापर्यंत झालेल्या कामाची गटाराची भिंत बुधवारी (दि. 1) सकाळी कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे या घटनेने उघड झाले आहे.
जेजुरी रेल्वेस्थानकासमोर सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठी चर खोदून गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 1) सकाळी हे काम सुरू असताना या गटाराची आत्तापर्यंत उभारलेली भिंत अचानकपणे कोसळली.

गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, या कामामुळे आबालवृद्धांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, माजी नगरसेविका अमिना पानसरे, विजय खोमणे, अलका होले यांनी केल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच या गटाराच्या निकृष्ट कामाबाबत दै. ’पुढारी’मध्येही बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत दि. 30 जानेवारी रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकारीवर्गाची बैठक होऊन चर्चा झाली. संबंधित अधिकारीवर्गाने प्रत्यक्ष पाहणी करावी, नागरिकांच्या जीविताशी व आरोग्याशी खेळू नये, अशा स्पष्ट सूचना खासदार सुळे यांनी बैठकीत दिल्या होत्या. त्यानुषंगाने रेल विभागाचे सहायक मंडल अभियंता सुरेंद्रकुमार सिंग, सातारा विभागाचे वरिष्ठ अभियंता ओशपाल यादव यांनी बुधवारी (दि. 1) गटाराच्या कामाची पाहणी केली व सुरू असलेले काम तत्काळ थांबवत भुयारी व बंद पाइपलाइन टाकूनच काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

स्क्रॅपमुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याची मागणी

रेल्वेस्थानकाच्या उत्तर दिशेला मोठी लोकवस्ती आहे. बाजूला अंगणवाडी व प्राथमिक शाळा आहे. मात्र, या पादचारी मार्गावर रेल्वेचे स्क्रॅप टाकण्यात आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. हे स्क्रॅप हटवावे व मार्ग खुला करावा; अन्यथा काही नागरिक या प्रश्नाबाबत आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे येथील रहिवासी संजय माने व रोहिदास कुदळे यांनी सांगितले. मात्र, हा पादचारी मार्ग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचा आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूचना व आदेश प्राप्त होणे गरजेचे असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button