

नाशिक : वृत्तवाहिनीच्या पत्रकारास एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना तिबेटीयन मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी किरण एम. नाईक (३१, रा. आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.
किरण यांच्या फिर्यादीनुसार ते तिबेटीयन मार्केट जवळील एका हॉटेलमध्ये सोमवारी (दि.२३) दुपारी १.४० च्या सुमारास मित्रासह बसलेले असताना दोन दुचाकीस्वार तेथे आले व त्यांनी दुचाकी लावली. त्यावेळी किरण यांनी दुचाकी बाजुला लावण्याची विनंती केली. त्यावरून दुचाकीस्वार संशयितांनी किरण यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. हॉटेलमध्ये बसलेल्या इतर दोन संशयितांनीही किरण यांना मारहाण करीत एकाने किरण यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.