डांगसौंदाणे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
डांगसौंदाणे येथील जलदुर्गा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तीन दिवसीय यात्रे निमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रथ मिरवणुकीने सुरवात झालेल्या यात्रेची सांगता हभप निवृत्ती नाथ महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाने झाली. यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीत चांदवड तालुक्यातील सुतारखेडे येथील पहिलवान धर्मा शिंदे हा यंदाचा जलदुर्गा केसरी ठरला.
धर्मा शिंदे यांनी मानपत्रासह 5 हजार 100 रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. मागील 3 वर्ष सतत जलदुर्गा केसरी ठरलेला दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्तंडला चितपट करीत शिंदे यांनी हा बहुमान मिळवला. शंभर हुन अधिक लहान मोठ्या कुस्त्यांची दंगल यावेळी झाली. चाळीसगाव, निफाड, चांदवड, देवळा, मालेगाव, लखमापुर आदी ठिकाणाहून आलेल्या पाहिलवानांनी आपले कसब दाखविले.
यात्रे दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रे दरम्यान ग्रामदैवत जलदुर्गाचे दर्शन घेतले. रथ पूजन पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी केले. रथ मिरवणुकी दरम्यान तरुणासह आबालवृद्धानी सहभाग घेतला. गावातुन सहवाद्य मिरवणूक काढली. सालाबादाप्रमाणे गुलाब पगारे यांनी देवीचा मुखवटा परिधान करीत रथ मिरवणुकीत सहभाग घेतला होता. यात्रेच्या सांगते निमित्त झालेल्या हभप निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनास पंचक्रोशीसह तालुका भरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.