नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

त्र्यंबकेश्वर सुपलीची मेट,www.pudhari.news
त्र्यंबकेश्वर सुपलीची मेट,www.pudhari.news
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इर्शाळवाडीच्या दरड घटनेने सुपलीची मेट आणि इतर मेट वस्त्यांना धोका असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'त प्रसिद्ध झाले आणि इतके दिवस गाफील असलेली प्रशासन यंत्रणा हलली आहे. शुक्रवारी (दि. 21) त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती, मंडल अधिकारी पल्लवी जाधव आणि मेटघर किल्ला ग्रामपंचायत ग्रामसेवक पगारे यांनी मेट वस्त्यांची संयुक्त पाहणी केली.

सुपलीची मेट आणि जांबाची वाडी येथे परिस्थिती निश्चितच चिंताजनक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेथील ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडली व आपल्याला सखल जागेवर स्थलांतरित करा, अशी मागणी केली. दरम्यान सुपलीची मेट स्थलांतराचा प्रस्ताव मंजूर आहे. त्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. मात्र प्रशासकीय कामातील दिरंगाईने जागेच्या मोजणीसारखे सोपस्कार प्रलंबित आहेत, तर जांबाची वाडी येथे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान याबाबत गांभीर्य लक्षात आल्याने प्रांताधिकारी ठाकरे हे शनिवारी (दि. 22) स्वत: पाहणी करण्यासाठी येत असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पर्यटकांनी ही घ्यावी खबरदारी

शनिवार, रविवार आणि पाऊस असताना पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचे नाहक साहस करू नये, असे आवाहन तहसीलदार संचेती यांनी केले आहे. दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, पहिणे घाटातील नेकलेस धबधबा, पाण्याचे प्रवाह, ब्रह्मगिरीचा अहिल्या धरणाजवळ येणारा धबधबा, तोरंगण घाटातील धबधबे या ठिकाणी निसरड्या जागा तयार झालेल्या आहेत. तेथे जाऊन सेल्फी घेण्याचे साहस करू नये. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुरक्षित सखल जागेवर थांबावे, घाट रस्त्यात वाहने उभी करून सेल्फी घेणे टाळावे. वाहनतळ असेल, त्याच जागेवर वाहन उभे करावे. दुगारवाडी धबधबा येथे खाली उतरू नये तसेच येथील नदीला पूर येतो, तेव्हा ते लक्षात येत नाही. वरच्या बाजूस असलेल्या कळमुस्ते शिवारात पाऊस झाल्यास त्याचा थेट परिणाम या प्रवाहावर होतो. त्यासाठी प्रवाहात उतरणे अथवा पाहणे हे प्रकार टाळावेत. ब्रह्मगिरीवर धुके असते. ब्रह्मगिरीवर जाताना पायऱ्यांच्या रस्त्याचा वापर करावा. पायवाटा अथवा अन्य ठिकाणाहून चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही पर्यटनस्थळावर जाताना दुपारी 3 च्या आत माघारी फिरावे. हरिहर गडावर जाण्यासाठी गर्दीचे दिवस टाळावे. कडयाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, अशा सूचना केल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news