अहमदनगर : अमित ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी | पुढारी

अहमदनगर : अमित ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून अमित ठाकरे यांचा आठव्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू झाला आहे. या दौर्‍यात ते मनविसेची पुनर्बांधणी करणार आहेत. या टप्प्यात अमित ठाकरे नगर दौर्‍यावर येणार आहेत. नगर शहरात 22 जुलै रोजी तर शिर्डी येथे 23 जुलैला असतील, अशी माहिती मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली.
ठाकरे यांच्या दौर्‍याचा प्रमुख उद्देश महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधणे हा आहे. विशेषतः नगरमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा हेतू आहे. राज्याच्या राजकारणात कोणते बदल झाले पाहिजे.

तसेच सामाजिक स्तरावर युवकांचे काय प्रश्न आहेत. कोणत्या मागण्या आहेत ते जाणून घेतले जाईल. त्या दृष्टीने संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन मनविसेने केले असल्याचे वर्मा यांनी सांगितले. ठाकरे यांच्या संवाद मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी 9860521022 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही वर्मा यांनी केले आहे.

दरम्यान, ठाकरे छत्रपती संभाजीनगरहून येणार असून, ते सकाळी शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतील. नंतर शेंडी बायपास येथे साडेअकरा वाजता मनविसे पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार आहेत. नंतर शासकीय विश्रामगृहावर दुपारी तीन वाजेपर्यंत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

ठाकरे यांचा हा दौरा अहमदनगरच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम करणारा ठरेल, असे हे नियोजन असल्याचे वर्मा यांनी सांगितले. मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, अ‍ॅड. अनिता दिघे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नगर तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, स्वप्नील वाघ, संकेत जरे, प्रमोद ठाकूर, तुषार हिरवे, संतोष साळवे, संदीप चौधरी आदी प्रयत्नशील आहेत.

अमित ठाकरे यावेळी श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधी स्थळाला ही भेट देणार आहे. ठाकरे परिवारातील अमित ठाकरे हे पहिले असे नेते आहेत की ते आनंदऋषीजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देत आहेत. यासाठी संपूर्ण नियोजन केले असल्याचे माहिती सुमित वर्मा यांनी दिली.

हेही वाचा

सांगली : शिरवळ येथून अपहरण; टोळी जेरबंद

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला

फौजदार प्रेमचंद ऑन ड्युटी मद्यधुंद ! नशेत वाहनचालकांना केली शिवीगाळ

Back to top button