शेवगाव : घुले बंधूंची घाईघाई बैठक, पण निर्णय नाही | पुढारी

शेवगाव : घुले बंधूंची घाईघाई बैठक, पण निर्णय नाही

शेवगाव (अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांच्या घाईघाई घेतलेल्या बैठकीत घुले बंधूंनी शरद पवार की अजित पवार असा कोणताच निर्णय जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांचा संभ्रम कायम राहिला आहे. मात्र, यावेळी संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. राजकीय निर्णयाबाबत आमच्यात दुमत नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, डॉ.क्षितिज घुले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.21) शहरातील सहकार सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात आपण सर्व सोबत राहू, सर्वांच्या विचारानेच यापुढे निर्णय घेण्यात येतील, आगामी सर्व निवडणुका जोमात लढवून आपली संघटना मजबूत करण्याचे आवाहन चंद्रशेखर घुले, क्षितिज घुले यांनी केले. घाईघाई बोलावलेली बैठक बहुधा निर्णय जाहीर करण्यासाठी असावी, अशी कार्यकर्त्यांची धारणा होती.

मात्र, बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार की अजित पवार गट याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. राष्ट्रवादीत फूट पडून तीन आठवडे होत आले तरी, घुले बंधु कोणताच निर्णय जाहीर करीत नसल्याने कदाचित याबाबत त्यांच्यात एकमत होत नसावे, अशी चर्चा चालू होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी सदर बैठक घेतली असावी, असे बोलले जात होते.

तर, कार्यकर्ते दुरावले की काय, याची खातरजमा व्हावी, या उद्देशाने बैठक घेतली असावी, अशाही शंका व्यक्त केल्या जात होत्या. दरम्यान प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्याच तालुक्याचा लोकप्रतिनिधी असावा, त्यासाठी घुलेंनी विधानसभा निवडणुक लढवावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

हेही वाचा

अहमदनगर : दुहेरी हत्याकांडातील सहा आरोपी जेरबंद

वाळकी : शेतात टाकलेल्या नवजात बाळाला जीवदान

पुणे : घरफोड्यांत अकरा लाखांचा ऐवज चोरीला ; बंद सदनिका चोरट्यांच्या टार्गेटवर

Back to top button