

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी शहर आणि जिल्ह्याच्या पश्चिम भागात हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. रब्बी हंगामाच्या पिकांसह द्राक्षाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण झालेले होते. त्यामुळे दररोज पावसाची शक्यता निर्माण होत होती. बुधवारीदेखील तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारच्या सुमारास शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. काही वेळानंतर पाऊस थांबला. मात्र, काही वेळाने सायंकाळच्या सुमारास पुन्हा पावसाने जोर धरला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. या अचानक आलेल्या पावसाने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते. मात्र, यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
पावसाळा संपला आणि बऱ्याच दिवस पावसाने उसंत घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा पावसाचे वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती. या पावसाने शहरातील सर्व भागांमध्ये व शहरालगतच्या ग्रामीण भागांत हजेरी लावली. गंगापूर, गोवर्धन, गिरणारे, दुगाव, मुंगसरा, दरी, मातोरी, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर या शिवारातील रब्बी हंगामाच्या पिकांसह द्राक्षशेती धोक्यात आली आहे. या भागांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागा असून, अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षउत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. द्राक्षपिके वाचविण्यासाठी औषधे व पावडरींचा आर्थिक भार शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. शिवाय फ्लॉवर पिकालाही अवकाळीचा फटका बसला असून, आधीच भाव नसल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे.
डांबरीकरणाचे तीन तेरा
अचानक झालेल्या पावसाने मनपाच्या रस्ते, खड्डे, पावसाळी गटार योजनेचा व नियोजनाचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. रस्त्यावर व खड्ड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून आले व सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या व नवीन रस्त्याच्या डांबरीकरणाचे तीन तेरा वाजले.
अवकाळी पावसामुळे फ्लॉवरचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. फ्लॉवर फुगली व फुटली आहे. तसेच तिचा रंगही काही प्रमाणात पिवळा झाला आहे. आधीच फ्लॉवरला भाव नसल्याने नुकसान झाले. त्यात पावसाने आणखी भर घातली आहे.
– गौरव माटे, शेतकरी, मखमलाबाद
कालच्या पावसाने द्राक्षांचे नुकसान झाले असून, यामुळे द्राक्षांची गळ व कुज झाली आहे. नियमित फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांच्या खर्चात पावसामुळे १० ते २० टक्के वाढ होणार आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या औषधांच्या खर्चाचे बजेट कोलमडणार आहे.
– निलेश साठे, शेतकरी, आडगांव
अचानक झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले असून, यामुळे गव्हावर तांबेरा हा रोग येवू शकतो. त्यामुळे गव्हाची उगवण कमी होवून त्यास तांबडा रंग येऊन गव्हाचा दर्जा ढासळणार आहे. परिणामी, गव्हावा हवा तसा भाव मिळणार नाही.
– रवींद्र तिखे, शेतकरी, मातोरी